मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची हजेरी
छ. संभाजीनगर/लातूर : प्रतिनिधी
मराठवाड्यातील ब-याच भागात मागच्या आठ ते दहा दिवसांपासून पावसाने दडी दिली होती. त्यामुळे उगवण झालेल्या कोवळ््या पिकांनी माना टाकायला सुरुवात झाली होती. त्यामुळे पावसाची प्रतीक्षा सुरू असताना रविवारी मराठवाड्यातील ब-याच भागात दुपारनंतर पावसाने हजेरी लावली. काही भागांत हलका तर काही भागांत मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे शेतक-यांना दिलासा मिळाला असून, कोवळी पिकेदेखील तरारली आहेत.
मराठवाड्यातील छ. संभाजीनगर, बीडसह नांदेड, परभणी, लातूर, हिंगोली, धाराशिव आदी भागांत रविवारी दुपारनंतर ढगाळ वातावरण होते. त्यामुळे काही भागांत मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाने हजेरी लावली. लातूर परिसरात दुपारी ४ च्या सुमारास चांगला पाऊस झाला. तसेच जिल्ह्यात औसा, उदगीर, जळकोट, निलंगा, चाकूर आदी तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. तसेच अहमदपूर, रेणापूर तालुक्यातील काही भागांतही पावसाने हजेरी लावली. नांदेड जिल्ह्यातही शहरासह जिल्ह्यात साधारण पाऊस झाला. रात्री उशिरापर्यंत रिमझिम पाऊस सुरूच होता. परभणी, धाराशिव जिल्ह्यातही ब-याच भागांत रिमझिम पाऊस झाला. तसेच जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण असल्याने सोमवारीही चांगला पाऊस होऊ शकतो, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
चक्रीय वातस्थितीमुळे वातावरणात बदल
अरबी समुद्रात सौराष्ट्र आणि कच्छजवळ चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. तसेच केरळ आणि महाराष्ट्राच्या किनारपट्टीजवळ विरुद्ध दिशेने येणा-या वा-याची प्रणालीही निर्माण झाली आहे. परिणामी कोकण आणि गोवा विभागात सर्वदूर पाऊस पडू शकतो. तसेच मराठवाड्यातही काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता आहे.