परभणी : प्रतिनिधी
प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात दि.१ ते ४ एप्रिल दरम्यान वादळी वा-यासह मध्यम पावसासह गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली असल्याची माहिती वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील हवामान विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
हवामान विभगाने दिलेल्या माहितीनुसार दि. १ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्हयात तर दि.२ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड जिल्हयात वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाट होणार असून वा-याचा वेग ताशी ५० ते ६० कि.मी. राहणार आहे. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर तूरळक ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
दि.१ व ३ एप्रिल रोजी बीड व धाराशिव जिल्हयात तर दि.२ एप्रिल रोजी परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. दि.३ एप्रिल रोजी परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, छत्रपती संभाजी नगर व जालना जिल्हयात तसेच दि.४ एप्रिल रोजी लातूर व धाराशिव जिल्हयात तूरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तविली आहे.
विस्तारीत अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाडयात दि.४ ते १० एप्रिल दरम्यान कमाल तापमान सरासरीएवढे व किमान तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे. सॅक, इसरो अहमदाबाद यांच्या उपग्रहाच्या बाष्पोत्सर्जनाच्या जिल्हानिहाय व तालूकानिहाय छायाचित्रानूसार मराठवाडयात बाष्पोत्सर्जनाचा वेग वाढलेला आहे.
वादळी वा-यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा तसेच गारपीटीचा अंदाज लक्षात घेता, काढणी व मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी. कापूस पिकाच्या प-हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून गुलाबी बोंड अळीच्या जीवनक्रमात घट पडेल अशा सुचना वनामकृविच्या तज्ञाकडून करण्यात आल्या आहेत.
पुढील तीन दिवसांत तापमानात घट होणार
पुढील तीन दिवसात कमाल तापमानात हळूहळू २ ते ४ अं.से. ने घट होऊन त्यानंतर हळूहळू वाढ होण्याची तर पुढील चार ते पाच दिवसात किमान तापमानात हळूहळू २ ते ३ अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे.