२ मंत्र्यांचे पर्यायी आंदोलन, खुद्द जरांगे यांनीच केला गौप्यस्फोट
जालना : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी आणखी एक नवीन गौप्यस्फोट केला. त्यांचे आंदोलन दडपण्यासाठी सरकार स्वत:चे आंदोलन उभे करणार आहे. सरकारचे दोन मंत्री या आंदोलनात सहभागी होणार आहेत. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दोन मंत्र्यांची चर्चा झाल्याची माहिती एका मंत्र्याने आपणास दिल्याचा दावा मनोज जरांगे यांनी केला.
सरकार आणखी एक मराठा आंदोलन उभे करणार आहे. त्या आंदोलनात २ मंत्री असणार आहेत. १२ ते १३ दिवस आमरण उपोषण केले जाणार आहे. त्यातील एक मंत्र्यांनी मला ही माहिती दिली. त्यानंतर १४ दिवसानंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावणार आहेत. मंत्र्यांना सोबत घेत सरकार नवे मराठा आरक्षण आंदोलन उभे करण्याच्या तयारीत आहे, असा गौप्यस्फोट मनोज जरांगे पाटील यांनी केला.
धस यांच्यावर पक्षाचा दबाव
धनंजय मुंडे यांना भेटण्यासाठी सुरेश धस यांच्यावर भाजपाने दबाव आणला. परंतु सुरेश धस यांनी मराठ्याला हे सांगणे गरजेचे होते की, माझ्यावर पक्षाने दबाव आणला. आमचा सुरेश धस यांच्यावर भरपूर जीव होता. परंतु सुरेश धस धनंजय मुंडेला भेटले. यामुळे मराठ्यांचा विश्वास उडाला, असे जरांगे म्हणाले. त्यांनी मुंडेंना भेटण्याआधी आम्हाला सांगितले असते तर मराठे धसांना डोक्यावर घेऊन नाचले असते, असेही जरांगे म्हणाले.
हत्येच्या आरोपपत्रात
होऊ शकते छेडछाड
धनंजय मुंडे आणि आमदार धस यांच्या भेटीमुळे संतोष देशमुख प्रकरणांतील दोषारोपपत्रातही छेडछाड होण्याची शक्यता आहे. परंतु यामधील एकही आरोपी सुटला तर सरकारचे काही खरे राहणार नाही, अशा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.