नागपूर : मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि त्यावरून गेल्या दोन महिन्यांपासून तापलेले राज्यातील वातावरण पाहता मुख्यमंत्री नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ठोस निर्णय घेतील असे अपेक्षित होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत निवेदन केल्यानंतर मराठा आरक्षणावरून सातत्याने महाविकास आघाडीवर आरोप आणि टीका करणा-या मुख्यमंत्री आणि सत्ताधारी महायुतीला माजी मंत्री आमदार अशोक चव्हाण यांनी चांगलेच सुनावले.
मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारमुळे गेले असे म्हणून एक बोट आमच्याकडे दाखवणार असाल तर चार बोटे तुमच्याकडेही जातात हे लक्षात ठेवा, असा इशारा चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या नेत्यांना दिला.
मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याच्या मुद्यावर अशोक चव्हाण यांनी हा प्रकार म्हणजे पुन्हा एकदा मराठा समाजाला गाजर दाखवण्याचा प्रकार असल्याची टीका केली आहे. मराठा आरक्षण नेमके कसे देणार, याबाबत मुख्यमंत्र्यांनी ना कोणती पुढील दिशा सांगितली, ना कोणती कालमर्यादा स्पष्ट केली. ही मराठा समाजाची शुद्ध फसवणूक आणि दिशाभूल आहे. मराठा आरक्षण देण्यासाठी पुढे नेमके काय करायचे आहे आणि ते केव्हापर्यंत होईल, याबाबत राज्य सरकारलाच माहिती नाही तर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना वारंवार तारखांवर तारखा का दिल्या?
१ सप्टेंबर २०२३ रोजी अंतरवाली सराटी येथे हरिनाम कीर्तन सोहळा सुरू असताना वयोवृद्ध नागरिक आणि महिलांवर बेछूट लाठीमार झाला. वरून आंदोलकांवरच गुन्हे दाखल केले. राज्य सरकारने ते गुन्हे मागे घेण्याचा शब्द अनेकदा दिला. मात्र, त्याबाबत मुख्यमंत्र्यांनी कालच्या भाषणात चकार शब्दही काढू नये, हे दुर्दैव आहे. मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या कामकाजाबाबत निराधार आरोप करून विद्यमान मुख्यमंत्री महाविकास आघाडीवर बोट दाखवणार असतील, तर चार बोटे त्यांच्याकडेच राहणार आहेत.
कारण तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना मोठ्या विश्वासाने मराठा आरक्षण उपसमितीवर नियुक्त केले होते. त्यावेळी राज्य सरकार कमी पडले, असे विद्यमान मुख्यमंत्र्यांचे म्हणणे असेल तर मग ते त्या उपसमितीत काय करत होते? असा सवालही अशोक चव्हाण यांनी केला.