25.3 C
Latur
Thursday, June 27, 2024
Homeलातूरमराठा आरक्षणासाठी अधिवेशनात एक दिवस राखीव ठेवा

मराठा आरक्षणासाठी अधिवेशनात एक दिवस राखीव ठेवा

लातूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणासाठी पावसाळी अधिवेशनात एक दिवस राखीव ठेवून चर्चा घडवावी, अशी मागणी लातूर ग्रामीणचे आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी केली. या मागणीचे पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांना गुरुवारी दिले. पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै या कालावधीत होत आहे. मराठा समाजाच्या मागण्या अद्याप मान्य झाल्या नाहीत. मराठा समाजाला कायद्याच्या कसोटीवर टिकणारे आणि सगे-सोय-यांच्या निकषात बसणारे आरक्षण मिळावे, अशी मागणी आहे. या मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांना उपोषणाला बसावे लागत आहे. सरकार या मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी पत्र पाठवून विधानसभा अध्यक्ष श्री राहुल नार्वेकर यांच्याकडे अधिवेशनातील एक दिवस मराठा आरक्षणासाठी राखीव ठेवण्याची मागणी केली आहे. यावर्षी २० फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन घेत राज्य सरकारने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण जाहीर केले, त्यातील तरतुदी आणि जानेवारीमध्ये वाशी येथे जरांगे पाटील यांना सरकारने दिलेल्या अश्वसानामध्ये फरक आहे. त्यामुळे  जरांगे पाटील मागील आठवड्यात पुन्हा उपोषणास बसले होते. सरकारच्या आश्वासनाचा मान ठेऊन त्यांनी १३ जुलैपर्यंत उपोषण स्थगित केले आहे. फेब्रुवारीमध्ये आरक्षणाचा निर्णय घाईने घेतल्यामुळे आरक्षणाची वैधता आणि तरतुदी याबद्दल  मराठा समाजामध्ये संशयाचे वातावरण आहे. याकडेही आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी पत्रातून लक्ष वेधले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR