लातूर : प्रतिनिधी
सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईकडे कूच केली आहे. येत्या २९ ऑगस्ट रोजी मराठा मोर्चा मुंबईवर धडकणार आहे. मात्र त्याआधीच लातूर हादरले असून येथे एका तरूणाने विष पिवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्याने राज्यातील महायुती सरकारवर टीका करत चिठ्ठी लिहून जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मराठा आंदोलन पेटण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणासंबंधी लातूरमध्ये धक्कादायक प्रकार उघकीस आला असून अहमदपूर तालुक्यातील शिंदगी बुद्रुक गावातील बळीराम मुळे (वय ३५) या तरूणाने विष पिवून आपले जीवन संपवण्याचा प्रयत्न केला आहे. यामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटण्याची भीती व्यक्त होत आहे. त्याच्यावर सध्या लातूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून ही धक्कादायक घटना उघडकीस आल्याने याचे आता पडसाद उमटताना दिसत आहेत.
बळीराम या तरूणाने यावेळी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडत सरकार फक्त वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप केला आहे. त्याने महायुतीचे सरकार फक्त आरक्षणाच्या मुद्द्यावर वारंवार चालढकल करत आहे. त्यामुळेच जरांगे पाटील यांना वारंवार उपोषण करावे लागत आहे, अशा आशयाची चिठ्ठी लिहली आहे. ती त्याच्या खिशात सापडली आहे.
तसेच या चिठ्ठीत त्याने, महायुतीचे सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यास असक्षम आहे. यामुळेच आपण आपल्या आयुष्याची अखेर करून घेत आहोत. सरकारने आतापर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा संपवायला हवा होता. मात्र अद्याप या प्रश्नाचे घोंगडे भिजत ठेवले आहे. यामुळेच आपण हा पर्याय निवडत असल्याचेही त्याने आपल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.