जालना : प्रतिनिधी
राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येणार आहे. मागील दीड वर्षापासून मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. आमरण उपोषण, आंदोलन आणि मोर्चा काढून त्यांनी राज्यव्यापी आंदोलन उभे केले होते. सर्व मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी अंतर्गत आरक्षण देण्याची मागणी जरांगे पाटील करत आहेत. तसेच मराठा आरक्षणासाठी लढा देणा-या सर्व तरुणांवरील गुन्हे काढून टाकावेत अशी देखील त्यांची मागणी आहे. यासाठी आता जरांगे पाटील यांनी महायुती सरकारला इशारा दिला आहे. संपूर्ण मराठा समाजासह मुंबईमध्ये येऊन मोर्चा काढण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
जालन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी माध्ममांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, यापुढे सांगायचे आणि बोलायचे कमी, पण आता करून दाखवायचे आहे. म्हणजे आता इथून पुढे सरकारची चाल खेळावी लागणार आहे. सरकार सुद्धा निवडून येईपर्यंत काही कळू देत नाही, बोलू देत नाही. फक्त गोड बोलते. आता अचानक आंदोलन करायचे आहे. या भूमिकेशिवाय सरकार ठिकाणावर येणार नाही. सरकार निवडून येईपर्यंत किती पाया पडत होते. किती लाडक्या बहिणींना पैसे दिले. पण आता निकष लावून लाडक्या बहिणींची संख्या कमी करत आहे. सरकार गोरगरिबांना कळू देत नाही. शेवटी बहीण ही बहीण असते, त्यामुळे तिला आता का योजनेतून बाहेर काढले जात आहे, असा राजकीय टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे.
पुढे जरांगे पाटील म्हणाले की, आता आम्हाला देखील माहिती आहे की डाव कसा टाकायचा? परंतु यावेळी आम्ही आरक्षण घेणारच. अजून थोडे थांबू, पण तयारी अशी करू की चारही बाजूंनी तुम्हाला जायला रस्ता मिळणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे सुद्धा लक्षात ठेवावे, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे.
पुढे मराठा नेते मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता खूप ऊन आहे नाहीतर त्यांना आताच हिसका दाखवला असता. मागच्या वेळी मुंबईला गेलो आणि सुखरूप परत आलो. नाहीतर त्यांना तेव्हाच झटका दाखवला असता. आम्ही काय मुंबईला जाऊ नये का? आम्हालाही बघायचं आहे मंत्री कुठे राहतो, आमच्या गोरगरीब शेतक-यांना सुद्धा मुंबई बघावी वाटते. आमचा मुंबईला जाण्याचा विचार थोडा थोडा चालू आहे. परंतु मी सध्या काही त्याबद्दल तुम्हाला सांगणार नाही. माझा डाव सांगणार नाही, असे म्हणत पुन्हा एकदा मुंबईला जाण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.