जरांगे यांच्याशी चर्चेनंतर माघार
बीड : प्रतिनिधी
मारहाण आणि गु्न्हेगारी टोळींच्या व्हिडिओने गाजत असलेल्या बीडमध्ये पुन्हा एकदा जबर मारहाणीची घटना घडली. शिवराज दिवटे या युवकास वाल्मिक कराडच्या टोळीतील पोरांनी मारहाण केल्यामुळे पुन्हा एकदा बीडच्या गुन्हेगारीचा मुद्दा राज्यात चर्चेत आला. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांकडून उद्या बीड बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, मनोज जरांगे पाटील यांच्याशी केलेल्या चर्चेनंतर हा बंद मागे घेण्यात आल्याची माहिती मराठा समन्वयकांकडून देण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यातील शिवराज दिवटे मारहाण प्रकरणाच्या निषेधार्थ उद्या बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली होती. मात्र, उद्या होणारा बंद स्थगित करण्यात आला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि सर्व समाज बांधवांशी चर्चा करून आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार असल्याने बीड जिल्हा बंद मागे घेण्यात आल्याची माहिती मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी दिली.
उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनीही याबाबत पोलीस अधीक्षकांशी बोलणी केली असून आता स्वत: अजित पवार बीड दौ-यावर जात आहेत. अजित पवार यांच्या उपस्थितीत उद्या तीर्थक्षेत्र विकास योजनेची आढावा बैठक होणार असून मंत्री पंकजा मुंडेही या बैठकीला उपस्थित असणार आहेत. अजित पवार उद्या बीड जिल्हा दौ-यावर असून येथील विविध विकास कामांची परळीत पाहणी करणार आहेत. दरम्यान, आता अजित पवारांच्या दौ-याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.