अहमदपूर : प्रतिनिधी
मागील सरकारने आणि आत्ताच्या सरकारनेही मराठा आरक्षणासंदर्भात मराठ्यांंच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असून येणा-या निवडणुकांमध्ये मराठा समाजाची खरी ताकद काय आहे ती आपल्याला दाखवून द्यायची हीच योग्य वेळ आहे. ज्याला पाडायचे आहे. त्याला पाडाच येत्या दि. ६ जूनपर्यंत सरकारने सगे सोयरÞचे अंमलबजावणी व कुणबी मराठा व मराठा ही एकच जात असल्याचा अध्यादेश न काढल्यास येत्या विधानसभेला हिसका दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांनी केले.
अहमदपूर तालुक्यातील श्री क्षेत्र रोकडोबा देवस्थान परचंडा येथील संवाद बैठकीत ते बोलत होते. जरांगे पाटील म्हणाले की, राजकारण समाजातील तरुणांचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याचे दिसत आहे मात्र यावेळेस सर्व राजकीय जोडे बाजूला सारत समाजासाठी कार्य करावे. आपल्याला आरक्षणापासून कोण रोखत आहे, आंदोलकांवर खोटे गुन्हे कोण दाखल करत आहे, याचा विचार करण्याची खरी गरज आहे तसेच तरुणांनी व्यसनापासून दूर राहत समाजामध्ये असलेली
दरी कमी करण्याचे काम करावे व पुन्हा एकदा नारायण गड येथे होणा-या ९०० एकर क्षेत्रावर जाहीर सभेसाठी सर्वांनी तयारीला लागावे असे आवाहन मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केले.
जरांगे पाटील यांचे सकाळी अकरा वाजता परचंडा नगरीमध्ये आगमन झाल्यानंतर तिथून वाजत गाजत त्यांची श्रीक्षेत्र रोकडोबा देवस्थान इथपर्यंत मिरवणूक काढण्यात आली तसेच श्रीक्षेत्र रोकडोबा देवस्थान येथे ध्वजारोहण करून येथील सभागृह येथे त्यांनी सकल समाज बांधवांशी संवाद साधला. यावेळी ह भ प किशन महाराज यांनी जरांगे पाटील यांना शुभाशीर्वाद दिले तर प्रास्ताविक शिवव्याख्याते शिवश्री शिवशंकर लांडगे यांनी केले. आभार प्रदर्शन पत्रकार दत्ता कानवटे यांनी केले. या संवाद बैठकीसाठी परचंडा व परिसरातील समाज बांधवांची उपस्थिती होती.रोकडोबा देवस्थानन समीती व ग्र्रामस्थांच्या वतीने जरांगे पाटील यांचा जंगी सत्कार करण्यात आला.