छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा उपोषण सुरू केले आहे. त्या उपोषणाची दखल न घेतली गेल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. मराठा समाजाकडून मनोज जरांगे यांना पाठिंबा देण्यासाठी ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत.
सकल मराठा समाजाच्या वतीने छत्रपती संभाजीनगरातील केंब्रिज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ मराठा समाजाने रास्ता रोको आंदोलन केले. सरकारने तात्काळ मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. यावेळी मोठ्या प्रमाणात समाजबांधवांची उपस्थिती होती. जालना-संभाजीनगर महामार्ग अडवून आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारविरोधात रोष व्यक्त केला.
परभणी, जालना, आळंदीमध्ये बंद यशस्वी
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पुण्याच्या आळंदीमध्ये आणि परभणीमध्ये आज बंद पुकारण्यात आला. या ‘बंद’ला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सकाळपासून अनेक दुकाने बंद आहेत. सकल मराठा समाजाकडून जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देण्यासाठी हा बंद पुकारण्यात आला होता. मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ ‘जालना बंद’ची हाक दिली. गेल्या सहा दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे जरांगे पाटील हे आमरण उपोषणास बसले आहेत. परंतु त्याची दखल घेतली नाही, यामुळे सकल मराठा समाजाच्या वतीने ‘जालना बंद’चे आवाहन करण्यात आले. मराठवाड्यात सर्वत्र मनोज जरांगे यांच्या आंदोलनास पाठिंबा वाढत आहे.
वडीगोद्रीमध्ये ओबीसींचे आंदोलन
जालन्यात रविवारी सकाळपासून तणावपूर्ण शांतता आहे. वडीगोद्रीमध्ये ओबीसींचे आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आजचा त्यांचा चौथा दिवस आहे. शनिवारी या ठिकाणी हाय व्होल्टेज ड्रामा झाला होता. त्यानंतर पोलिसांनी सतर्कता म्हणून सकाळपासूनच बंदोबस्त वाढवला आहे.