विश्व साहित्य संमेलनात मुख्यमंत्र्यांचे आवाहन
पुणे : प्रतिनिधी
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर हा मराठी साहित्य जतन करण्यासाठी करण्यात यावा जेणेकरून त्याचा लाभ येणा-या भावी पिढीला होऊ शकणार आहे, अशी अपेक्षा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या परिसरात आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय तिस-या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक मधू मंगेश कर्णिक यांना पहिला साहित्य भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,अजित पवार मराठी भाषा मंत्री उदय सामंत, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गो-हे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होते. शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनापूर्वी बालगंधर्व रंगमंदिरापासून ते फर्ग्युसन कॉलेजपर्यंत शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती. शोभायात्रेत फेटे बांधून ज्येष्ठ मराठी साहित्यिक,परदेशी मराठी भाषिक, कलावंत, महिला आणि युवा लेखकांचा सहभाग होता. संमेलनात तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी साहित्याला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देण्याची गरज आहे. कारण आता एआयचे युग सुरू झाले आहे. या अभिनव संकल्पनेची सुरुवात मराठी भाषा विभागाने करावी. जगात एकही देश असा नाही की जेथे मराठी माणूस पोचला नाही. परदेशात जेथे जेथे जातो तेथे मराठी माणसाकडून स्वागत करण्यात येते. याचा नक्कीच आनंद आहे. मी पुन्हा येईन हे वाक्य जणू पाठपुरावा करीत आहे. कारण एखादा शब्द उच्चारला जातो, त्यावेळी त्याचा अर्थ आणि काळ बदलत असतो. यापुढील काळात हे संमेलन जेथे भरविले जाणार आहे तेथे येईन, असे ते म्हणाले.
वादाशिवाय संमेलन
होऊच शकत नाही
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले की, उदय सामंत मगाशी सांगत होते की, काही लोकांनी वाद निर्माण केला. तुम्हाला मी सांगू शकतो की साहित्य संमेलन असो, नाट्यसंमेलन असो, विश्व मराठी संमेलन असो वाद निर्माण झाला नाही तर ते मराठी संमेलन होऊ शकत नाही. वाद, विवाद, प्रतिवाद हा झालाच पाहिजे. यातूनच ख-या अर्थाने मंथन होऊ शकते, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.