30.4 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeराष्ट्रीयमराठी भाषा अमृताहुनी गोड

मराठी भाषा अमृताहुनी गोड

९८ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधानांचे गौरवोद्गार
विनायक कुलकर्णी
छत्रपती शिवाजी महाराज साहित्यनगरी नवी दिल्ली :
आज जागतिक मातृभाषा दिवस आहे. दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी दिवससुद्धा अतिशय चांगला निवडला आहे. मी जेव्हा मराठी भाषेबाबत विचार करतो. तेव्हा मला संत ज्ञानेश्वर महाराजांची एक ओवी आठवते. माझ्या मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके म्हणजे मराठी भाषा ही अमृताहुनी गोड आहे. त्यामुळे मराठी भाषेच्या प्रति माझे प्रेम आहे. मी मराठी बोलण्याचा नेहमी प्रयत्न केला, असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. यावेळी त्यांनी मराठीत शूरता, वीरता, मराठी सौंदर्य, संवेदना, समानता, समरसतेसोबत आध्यात्म आणि आधुनिकतेचे स्वरदेखील आहेत, असे मोदी म्हणाले.

अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ आणि सरहद्द संस्था यांच्या वतीने नवी दिल्ली येथील ताल कटोरा स्टेडियमवर आयोजित ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी संमेलन अध्यक्षा तारा भवाळकर, संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मावळते संमेलनाध्यक्ष रविंद्र शोभणे, महामंडळ अध्यक्षा उषा तांबे, सरहद्द अध्यक्ष संजय नहार व्यासपीठावर उपस्थित होते. या संमेलनासाठी मराठी सारस्वतांची मांदियाळी जमली असून, देश व विदेशातील साहित्य रसिकही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.
संमेलनाच्या उद्घाटनानंतर पंतप्रधान मोदी यांनी मराठी सारस्वतांना माझा नमस्कार, असे म्हणत मराठीतून आपल्या भाषणाला सुरुवात केली. भाषा समाजाच्या निर्माणासाठी महत्वाची भूमिका निभावत आहे. जेव्हा भारताला आध्यात्मिकतेची गरज होती, तेव्हा महाराष्ट्रातील अनेक संतांनी समाजाला नवी दिशा देण्याचे काम केले, असे ते म्हणाले.

मराठी साहित्य संमेलन अशा वेळी होत आहे, जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाली, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीचे ३०० वर्षे पूर्ण झाली. तसेच महाराष्ट्राच्या धर्तीवर १०० वर्षांपूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सुरुवात झाली होती. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आपले १०० वर्ष साजरे करत आहे. रा. स्व. संघामुळेच मला मराठी भाषेशी संबंध आला, असेही पंतप्रधान म्हणाले.
प्रास्ताविकात महामंडळ अध्यक्षा तांबे यांनी सर्वांचे स्वागत करुन संमेलन आयोजनामागाची भूमिका मांडली.सन १९५४ मध्ये येथे संमेलन झाले होते. आता मराठी भाषेस अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. त्यानंतर येथे संमेलन होत आहे. आयोजक संजय नहार यांनीही मनोगत व्यक्त केले. साहित्य संमेलनाची सुरुवात महाराष्ट्र गीताने तर संमेनलाचा समारोप पसायदानाने झाला. काश्मीर कन्या शमिमा अख्तरने प्रारंभी सूरमधुर आवाजात गर्जा महाराष्ट्र गीत सादर केले. त्यावेळी पहाडी व सुरेल आवाजाने दिल्लीतील सभागृह स्वरमय झाले होते. या गीताला आणि आवाजाला संमेलनस्थळी उभे राहून उपस्थितांनी दाद दिली. तसेच पहिल्या दिवसाच्या समारोपप्रसंगी पुन्हा शमिमाने माईक हाती घेतला आणि संत ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान गायिले. त्यावेळी उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.

राजकीय संस्कृतीचे दर्शन
संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांच्या हाताला धरून दीप प्रज्वलन केले. तसेच खुर्चीवर बसण्यासाठी खुद्द मोदींनी मदत केल्याचे पाहायला मिळाले. एवढेच नव्हे तर खुर्चीवर बसताच आदराने पाण्याचा ग्लासदेखील भरून दिला. या कृतीने पंतप्रधान मोदींनी सर्वांची मने जिंकली आणि यातून राजकीय संस्कृतीचे दर्शनही घडले. तेव्हा सर्वांनी टाळ््या वाजवून दाद दिली.

मराठी भाषा बोलण्यातून
विस्तारली : भवाळकर
मराठी फक्त लिखीतच नाही तर ती बोलीतून पसरली आहे. भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असते. भाषा ही जोडणारी गोष्ट असायला हवी, तोडणारी नाही असे मत दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी व्यक्त केले. मराठी भाषा संतांनी टिकवली, आमचे संत पुरोगामी होते, असेही भवाळकर म्हणाल्या. भाषा ही बोलली तर जीवंत राहते, नुसती पुस्तकात आणि ग्रंथात असून उपयोग नाही, असेही त्या म्हणाल्या. मराठी भाषा बोलण्यातून विस्तारली, असेही भवाळकर म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR