34.5 C
Latur
Thursday, April 3, 2025
Homeमहाराष्ट्रमराठी भाषेचा वापर करण्यावरून मनसे आक्रमक

मराठी भाषेचा वापर करण्यावरून मनसे आक्रमक

बँकेतील इंग्रजी भाषेतील बोर्ड फाडले

मुंबई : प्रतिनिधी
मनसेने मराठी भाषेच्या वापरावर जोरदार आक्रमक भूमिका घेतली आहे. बँका आणि अन्य संस्थांना मराठीत व्यवहार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. चारकोपमध्ये बँकेला नोटीस देण्यात आली आहे, तर पुण्यात आयसीआयसीआय बँकेवर कारवाई झाली.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्यावरून मनसेच्या पदाधिका-यांना सक्रिय होण्याचा इशारा दिला आहे. आता मनसे पदाधिका-यांनी विविध बँकांच्या भेटी घेऊन मराठी भाषेचा वापर करण्याबद्दल तंबी दिली आहे. आता मराठी भाषेवरून मनसे आक्रमक झाली आहे. मराठी भाषेबाबत मनसे विभाग अध्यक्ष दिनेश साळवी यांनी चारकोपमधील बँकेला नोटीस दिली आहे. कृपया आम्हाला आमच्या स्टाईलने कारवाई करायची वेळ आणू नका, असे मनसेने म्हटले.

चारकोप विधानसभेचे विभागाध्यक्ष दिनेश साळवी म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. तरी कित्येक ठिकाणी मराठी भाषेचा आणि मराठी माणसांचा अपमान होत असलेल्या घटना समोर आल्या आहेत. कामगार क्षेत्रातील नियम, ८० टक्के कामगार स्थानिक असले पाहिजेत, त्यांना मराठी बोलता आले पाहिजे, पण असे होत नाही. म्हणून मनसे चारकोप विधानसभेच्या वतीने चारकोप विधानसभेतील, बँक, कंपनी/कारखाने, आस्थापना, मॉल आणि मनपा आर/दक्षिण विभागीय कार्यालयाला लेखी पत्र दिलेले आहे.

कामगार क्षेत्राचे नियम पाळले गेले पाहिजेत, सदर ठिकाणी मराठीत बोललं गेलं पाहिजे. पत्रव्यवहार मराठीत झाले पाहिजेत आणि मराठी भाषेचा व मराठी माणसांचा अपमान कुठेही झाला नाही पाहिजे. कृपया आम्हाला आमच्या स्टाईलने कारवाई करायची वेळ आणू नका, असा इशारा दिनेश साळवींनी दिला.

पुण्यात बँकांची तपासणी
तर पुण्यातही मनसैनिकांनी आयसीआयसीआय बँकेत तपासणी केली आहे. गुढीपाडवा मेळाव्यातून राज ठाकरे यांनी विविध आस्थापनांमध्ये दैनंदिन व्यवहार मराठी भाषेत झाला पाहिजे असे सांगितले होते. यानंतर पुण्यातील बंडगार्डन येथील आयसीआयसीआय बँकेच्या मुख्यालयात करण्यात आली. मनसे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर आणि कार्यकर्ते बँकेच्या कार्यालयात जाऊन बँकेच्या अधिका-यांशी त्यांनी संवाद साधला. अधिका-यांशी संवाद साधून झाल्यानंतर बाहेर येताना मनसेच्या पदाधिका-यांकडून बँकेत लावलेले इंग्रजीतील बोर्ड फाडण्यात आले. त्याचबरोबर बँकेच्या कार्यालयात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा बोर्ड देखील लावण्यात आला.

मनसेच्या कार्यकर्त्यांनी बॅनर काढले
तर दुसरीकडे मुंबईच्या दादरमध्ये शिवसेनेने लावलेले बॅनर मनसेने उतरवले आहे. शिवसेना भवनासमोर लावलेले मोठे बॅनर महापालिकेला बोलावून मनसेला काढायला लावले. समाधान सरवणकर यांनी बॅनर लावले होते. यात गंगाजल शुद्धच आहे, पण विचारांचे काय.. असा उल्लेख करत मनसेला अप्रत्यक्ष टोला लगावला होता. मात्र या बॅनरवर आक्षेप घेत मनसेच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर काढले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR