मुंबई : प्रतिनिधी
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे अशी मागणी सगळीकडे जोर धरू लागली आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एका लग्नसोहळ्यासाठी एकत्र पाहायला मिळाले. यातच आता अभिनेते महेश मांजरेकर यांनी ‘वास्तव में’ या कार्यक्रमात राज ठाकरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांना ‘समजा शिवसेना फुटली, नाही फुटली तर तुम्ही अजूनही एकत्र येऊ शकता का?’ असा प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका मांडली आहे. यावरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चा रंगल्या आहेत.
याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मीसुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याचे आवाहन करतो. पण माझी एक अट आहे. जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की, महाराष्ट्रातून गुजरातमध्ये हे सगळे उद्योग घेऊन जात आहेत. तेव्हाच जर विरोध केला असता तर आज ते सरकार तिथे बसले नसते. तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्राच्या हिताच्या आड जो कोणी येईल त्याचे स्वागत मी करणार नाही. त्याला मी घरी बोलवणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याच्याबरोबर पंगतीला बसणार नाही हे पहिलं ठरवा आणि मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा. मी आज सांगतो, माझ्याकडून कोणाशीच भांडणं नव्हतीच, मिटवून टाकली चला, पण पहिलं हे ठरवा. त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचे की, भाजपसोबत जायचे की शिवसेनेसोबत म्हणजे माझ्यासोबत ..एसंशिंसोबत नाही. पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचे, मराठीचे आणि हिंदुत्वाचे हित होणार आहे माझ्याबरोबर की भाजपबरोबर? आणि मग काय द्यायचा आहे तो पाठिंबा द्यायचा आहे, विरोध करायचा आहे तो बिनशर्त करा माझी काही हरकत नाही.
‘‘महाराष्ट्राचे हित ही माझी एकच शर्त आहे. त्यामुळे बाकीच्यांना या पोरांना, गाठीभेटी आणि कळत-नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही. ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हाळी द्यायची.’’ असे उद्धव ठाकरे म्हणाले.