राज ठाकरे यांचा इशारा, मराठीत बोलायला भाग पाडा
मुंबई : प्रतिनिधी
कोणाशी माझी मैत्री असो वा दुश्मनी, महाराष्ट्र, मराठी माणूस आणि मराठी भाषेसाठी कधीही तडजोड करणार नाही, अशी गर्जना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली. कायमस्वरुपी तुम्ही मराठीत बोला. समोरच्याला मराठीत बोलायला भाग पाडा, असे सांगतानाच आमची सत्ता रस्त्यावर आहे. ५६ इंचाची छाती काढून तुम्ही फिरा. हा महाराष्ट्र तुमच्या बापाचा आहे. त्यामुळे माज दाखवत अंगावर येणा-याला ठेचायचे, असेही ठाकरे म्हणाले.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या मिरा भाईंदरमधील भाषणाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष होते. अखेर मीरा भाईंदर येथील सभेतून राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला. मुख्यमंत्र्यांनी त्रिभाषासूत्री महाराष्ट्रात लागू करणार असल्याचे म्हटले आहे. त्यावर उत्तर देत महाराष्ट्रात त्रिभाषासूत्री लागू केल्यास दुकानच नाही तर शाळाही बंद करू, असा इशारा दिला.
कानाला मराठी समजत नसेल तर कानाखाली बसणारच, असे सांगतानाच मस्ती करणार असेल तर दणका बसणार म्हणजे बसणारच, असे ठाकरे म्हणाले. सगळे मतदारसंघ अमराठी लोकांचे करायचे आहेत. बाहेरची माणसे नुसती येत नाहीत तर हे मतदारसंघ बनवत आहेत. त्यानंतर त्यांचेच नगरसेवक, आमदार आणि खासदार होणार, तुम्हाला फेकून देणार असे ठाकरे म्हणाले. षड्यंत्र ओळखा, मुंबई गुजरातला मिळवण्यासाठी हा खाटाटोप सुरु असल्याचे राज ठाकरे म्हणाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तिसरी हिंदी भाषा आम्ही सक्तीची करणार म्हणजे करणारच. राज्य सरकारला आत्महत्या करायची असेल तर त्यांनी करावी असा इशाराही राज ठाकरे यांनी दिला.
मराठीला ३ हजार
वर्षांचा इतिहास
हिंदीला २०० वर्षांचा इतिहास आहे तर मराठी भाषेला अडीच ते तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. पण अद्याप एक रुपयाही आला नाही. अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी १४०० वर्षाचा इतिहास असणे गरजेचे आहे. हिंदाला हा दर्जा देण्यासाठी आणखी १२०० वर्ष आहेत. हिंदी भाषेमुळे नट, नट्यांचे भले झाले, या पलिकडे कोणाचे भले झाले, असा सवाल राज ठाकरेंनी केला.