पुणे : प्रतिनिधी
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर विश्व मराठी संमेलन येथे होत असून पुस्तक महोत्सवाप्रमाणेच मराठी भाषेची ख्याती विश्वस्तरावर पोहोचवण्यासाठी मराठी संमेलनात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
फर्ग्युसन महाविद्यालय येथे ३१ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत होणा-या विश्व मराठी संमेलनाच्या नियोजनाच्या आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. हे संमेलन मराठी भाषेच्या अस्मितेचे संमेलन असून संमेलनात विविध कार्यक्रम होणार असून त्यामध्ये विज्ञान तंत्रज्ञानावर आधारित, युवा आणि मराठी भाषा, स्त्री साहित्य आणि मराठी, बालसाहित्य,संत साहित्य आदी विषयांवर परिसंवाद होणार आहेत तसेच यूट्यूबच्या माध्यमातून जगभरात पोहोचलेल्या तरुण पिढीसाठी कार्यक्रम होणार आहेत यावर्षीपासून मराठी भाषा सातासमुद्रापार नेणा-या ज्येष्ठ साहित्यिकाला साहित्यभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
यावर्षीचा साहित्यभूषण पुरस्कार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक यांना प्रदान करण्यात येणार आहे.संमेलनाला येणा-या २५ हजार विद्यार्थ्यांना पुस्तक महोत्सव समितीच्या माध्यमातून एक एक पुस्तक भेट देण्यात येणार आहे.
तसेच या संमेलनामध्ये पुस्तक आदान- प्रदान करण्याचा आगळावेगळा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी डोंबिवलीच्या पै फाउंडेशन संस्थेकडून २ लाख ५० हजार पुस्तके आणण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत स्वत: जवळची वाचून झालेली पुस्तके जमा करून संमेलनस्थळी उपलब्ध असलेले पुस्तक बदलून घेता येणार आहे.