26.4 C
Latur
Saturday, January 4, 2025
Homeमहाराष्ट्रमराठे पुन्हा रस्त्यावर उतरणार

मराठे पुन्हा रस्त्यावर उतरणार

मनोज जरांगे यांचा सरकारला निर्वाणीचा इशारा

जालना : प्रतिनिधी
राजकारणात, समाजकारणात काम करताना कोणी कोणाचे लाडके नसते, शत्रू नसतो, विरोधक नसतो. ज्या ज्या वेळेस चुका होतील त्या त्या वेळेस बोलावे लागेल. मुख्यमंत्री दिलेला शब्द पाळत असतील तर आम्ही अपेक्षा ठेवून आहोत. शब्द नाही पाळला तर आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत.

दरम्यान, मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड याला अटक झाली असली तरी तीन आरोपी फरार आहेत. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शब्द दिला आहे. काही दिवसांत आरोपींना अटक करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळला पाहिजे. सगळ्या आरोपींना अटक करून कठोर शिक्षा झाली पाहिजे. मुख्यमंत्री शब्दाला खरे उतरले नाहीत तर मराठे रस्त्यावर येतील, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे म्हणाले, मयत संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आले होते. या प्रकरणातील आरोपीला अजून अटक झालेली नाही याबाबत त्यांनी चर्चा केली. आमच्या सर्वांची इच्छा आहे, सर्व आरोपींना अटक झाली पाहिजे. त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यासाठी आता राज्यभर मोर्चे सुरू झाले आहेत.

मनोज जरांगे या प्रकरणातील मंत्री धनंजय मुंडे यांचा सहभाग असल्याच्या आरोपाबाबत म्हणाले की, धनंजय मुंडे यांचा या हत्या प्रकरणात सहभाग आहे की नाही हे लवकरच सिद्ध होईल. आता चौकशी सुरू झाली आहे. काही आरोपी फरार आहेत. या प्रकरणातील आरोपींना मोक्का लागणार आहे. ३०२ चा गुन्हा लावला जाऊ शकतो. सरकारने हे केले नाही तर मराठे पुन्हा रस्त्यावर उतरतील, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR