अहमदपूर : प्रतिनिधी
मराठा आरक्षणाची दाहकता वाढली आहे. आरक्षणाच्या मागणीची सुरुवात स्वर्गीय अण्णासाहेब पाटील, छत्रपती संभाजी राजे, स्वर्गीय आमदार विनायकराव मेटे, मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाला दिशा देण्याचे काम केले आहे. मराठा आरक्षण निर्णायक ठिकाणावर येऊन ठेपले असून शासनाने त्वरित टिकणारे आरक्षण देण्याची मागणी आमदार बाबासाहेब पाटील यांनी केली आहे.
मराठा आरक्षण देण्याच्या मागणीसाठी जेव्हा मोर्चे निघाले तेव्हा त्यात आमदार असूनही सहभागी झालो होतो. मुंबईमध्ये महात्मा गांधी पुतळ्याजवळ आणि सहकारी आमदारांनी माझ्यासोबत लाक्षणिक उपोषण केले. सत्ताधारी पक्षाचा असलो तरी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मंत्रालयाला टाळे ठोकले. राजभवनावर जाऊन राज्यपालांना निवेदन देत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विशेष अधिवेशन बोलवण्याचीही मागणी केली आहे. माझ्या मतदारसंघातील महेश कदम नावाच्या युवकाने मी मुंबईमध्ये असताना आत्महत्या केली. सरकारने या प्रकरणी मदत करू असे आश्वासन दिले परंतु तशा प्रकारची मदत अद्यापही मिळाली नाही. मराठा आरक्षणासोबतच धनगर, मुस्लिम, ंिलगायत, कोळी समाजासही आरक्षण देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.