लातूर : प्रतिनिधी
येथील विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात मागील एक महिन्यापासून सुरु असलेल्या अवयवदान जनजागृती मोहिमेची सांगता दि. ३ ऑगस्ट रोजी रॅलीच्या आयोजनाने झाली. यादरम्यान आयोजित विविध कार्यक्रमांसह ‘मरावे परी अवयवरुपी उरावे’, या पथनाट्याने सर्वांचे लक्षवेधले.
रॅलीचे उद्घाटन विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. उदय मोहिते, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदिप ढेले, वैद्यकीय अधिक्षक डॉ. सचिन जाधव, उपाधिक्षक डॉ. शैलेंद्र चौहान, अंधश्रद्धा निमुर््लन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे यांनी हिरवा झेंडा दाखवून केले. रॅलीमध्ये या संस्थेतील वैद्यकीय, परिचर्या विद्यार्थी व बी. पी. एम. टी. विद्यार्थी, कै. बब्रुवान विठ्ठलराव काळे मांजरा आयुर्वेदिक महाविद्यालय लातूर येथील विद्यार्थी, एम. आय. एम. एस. आर. दंत व वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, असे एकूण ५०० विद्यार्थ्यांचा व अध्यापक अधिकारी, कर्मचारी यांचा सहभाग होता. रॅलीचे मार्गक्रमण महात्मा गांधी चौक-मिनी मार्केट मार्गे परिचर्या महाविद्यालय येथे रॅलीची सांगता करण्यात आली.
रॅली समारोप समारंभामध्ये अवयवदान जनजागृतीसाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेल्या निबंध स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, कविता स्पर्धा, विविध ठिकाणी पथनाटय यातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले. पारितोषिक वितरणानंतर महाविद्यालयातील पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी ‘मरावे परी अवयवरुपी उरावे’ या पथनाटयाचे प्रा. डॉ. निलिमा देशपांडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सादरीकरण केले. रॅलीच्या माध्यमातून जनतेपर्यंत अवयव दानाचे महत्त्व पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात आला. लोकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रॅलीला भरभरुन प्रतिसाद दिला. या उपक्रमामुळे समाजात अवयव दानाबद्दल जागरूकता वाढली आहे आणि अधिकाधिक लोकांनी अवयव दानाची प्रतिज्ञा केली आहे.
या कार्यक्रमास डॉ. अजय ओव्हाळ, उप अधिष्ठाता, डॉ. उमेश लाड, उप अधिष्ठाता, डॉ. सुनिल होळीकर, विशेष कार्य अधिकारी, डॉ. एकनाथ माले, एम.आय.एम.एस.आर महाविद्यालय, लातूर, प्राध्यापक व विभागप्रमुख, डॉ. अजित नागांवकर, डॉ. रणजीत हाके पाटील, डॉ. विनोद कंदाकुरे, डॉ. मेघराज चावडा, डॉ. विवेकानंद वाघमारे, डॉ. सुधिर पडवळ, डॉ. महादेव बनसुडे, श्रीमती. लक्ष्मी आपटे, अधिसेविका, अश्विनी बेले, प्राचार्या, परिचर्या महाविद्यालय इत्यादी उपस्थित होते. सदर रॅली व कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. विनायक सिरसाठ, डॉ. व्यंकटेश जोशी, डॉ. उमेश देशमुख, डॉ. शब्दाली केंद्रे यांनी मोलाची भूमिका बजावली.