मुंबई : प्रतिनिधी
महिन्याभरापासून त्रिभाषा धोरणावरून निर्माण झालेला मराठी भाषेचा मुद्दा चांगलाच तापला. यानंतर काल व्यावसायिक सुशील केडिया यांनी मराठी भाषेवरून राज ठाकरेंना ओपन चॅलेंज दिले होते. यानंतर मनसैनिकांनी त्यांचे ऑफिस फोडले. दरम्यान आज केडिया यांनी राज ठाकरेंची जाहीर माफी मागितली आहे. व्हीडीओ शूट करून त्यांनी मराठी भाषा अतिशय चांगल्या पद्धतीने शिकणार असल्याचे सांगितले.
माझी चूक मला मान्य आहे. त्याबाबत मी खेद व्यक्त करत आहे. मी माफी मागतो. मला माफ करा, माझे वक्तव्य मागे घेतो. लवकरच मी मराठी भाषा अतिशय चांगल्या पद्धतीने शिकेल. हे बिघडलेले वातावरण नीट करा. माझी चूक मला समजली आहे. ती सुधारू इच्छितोय. माझे ट्वीट तणाव आणि दडपणाखाली झाले, केडियांनी आता राज ठाकरेंची ‘हिरो’ म्हणून स्तुती केली आहे. एवढेच नाहीतर त्यांनी मराठी भाषेबद्दल ट्वीट करताना सुस्थितीत नसल्याचेही स्पष्ट केले आहे.
दरम्यान, मनसेकडून मराठी भाषा बोलण्याचा आग्रह करण्यात आल्यानंतर सुशील केडियांनी मराठी भाषेबद्दल वादग्रस्त टिप्पणी करत राज ठाकरेंना आव्हान दिले होते. ३० वर्षांपासून मुंबईत राहतोय. पण मला अजूनही मराठी नीटसं येत नाही. मी मराठी न शिकण्याची प्रतिज्ञा घेतो, असे वादग्रस्त शब्द केडियांनी वापरले. त्यानंतर संतप्त मनसैनिकांनी केडियांचे मुंबईतील वरळी येथील कार्यालय फोडले. त्यानंतर काहीच तासांत केडियांचा सूर नरमल्याचे दिसते.