घोडेबाजार अटळ, कुणाचे आमदार फुटणार?
मुंबई : प्रतिनिधी
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलैला होणा-या निवडणुकीसाठी १२ उमेदवार रिंगणात असणार आहेत. महाविकास आघाडीकडून ३ उमेदवार दिल्याने आता ही निवडणूक होणे अटळ आहे. विधान परिषदेच्या या ११ जागांसाठी १२ उमेदवार रिंगणात उतरल्याने महाविकास आघाडी आणि महायुतीला मतांची जुळवाजुळव करून आपल्या उमेदवारांना निवडून आणण्याचे मोठा आव्हान असणार आहे. यात ऐन मतदानाच्या वेळी फाटाफूट अटळ मानली जात आहे. यात नेमका कुणाला धक्का पोहोचणार हे निवडणुकीनंतर स्पष्ट होणार आहे.
विधानपरिषदेची १२ जुलैला होणारी निवडणूक बिनविरोध होईल, अशी स्थिती होती. मात्र शेवटच्या दोन दिवसांमध्ये महाविकास आघाडीने तिसरा उमेदवार दिला. त्यामुळे या निवडणुकीची चुरस आणखी वाढली आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून शेकापचे जयंत पाटील आणि वाईल्ड कार्ड एन्ट्री झाली ते शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मिलिंद नार्वेकर यांची. त्यामुळे आता महाविकास आघाडीला आपला तिसरा उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी २३ मतांचा कोटा असेल. यात महाविकास आघाडीकडे शरद पवार गट (१२), उद्धव ठाकरे गट १५ अधिक १ (१६) आणि कॉंग्रेस (३७) असे मिळून एकूण ६५ सदस्य आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीला आणखी ४ मतांची गरज आहे, तर महायुतीकडे भाजप (१०३), अजित पवार गटाकडे ३ अपक्षांसह (४३) आणि शिंदे गटाकडे (३८) तसेच भाजपला पाठिंबा देणारे ७ अपक्ष आणि शिंदे गटाला पाठिंबा देणारे १० असे एकूण २०१ आमदार आहेत तरीही महायुतीला आणखी ६ मतांची गरज आहे.
छोट्या घटक पक्षांकडे लक्ष
बहुजन विकास आघाडीकडे ३, समाजवादी पक्ष २, एमआयएम २, माकप-१, शेकाप १ असे ९ आमदार आहेत. यात शेकापचे मतदान तर मिळेलच. पण सोबत इतर छोट्या पक्षांतील आमदार काय भूमिका घेतात, हेही महत्त्वाचे आहे. याशिवाय राष्ट्रवादी, शिवसेनेतील काही आमदार नाराज आहेत. त्याचाही फटका महायुतीला बसू शकतो, असेही बोलले जात आहे.