मुंबई : प्रतिनिधी
अधिवेशनाच्या दुस-या दिवशी महाविकास आघाडीतील नेत्यांनी आमदारकीची शपथ घेतली. परंतु, यावेळी महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि दोन महत्त्वाच्या पदांवर दावा केल्याची माहिती देण्यात आली.
राज्य चालवण्यासाठी जेवढे सत्ताधारी महत्त्वाचे असतात, तेवढेच विरोधक महत्त्वाचे आहेत. विरोधी पक्षनेतेपद आम्हाला मिळावे, असे आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगितले. विरोधी पक्ष नेता निवडीसाठी संख्याबळ महत्त्वाचे नाही. हा मुद्दा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पटवून दिला. विरोधी पक्षनेतेपदासह विधानसभा उपाध्यक्षपद मिळावे, असे दोन प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मांडण्यात आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमच्या दोन प्रस्तावासंदर्भात सकारात्मक आहेत. विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर यासंदर्भात निर्णय होईल, अशी माहिती भास्कर जाधव यांनी दिली.
दरम्यान, गेल्या अनेक वर्षांची परंपरा होती की, सत्ताधा-यांकडे विधानसभा अध्यक्षपद तर विरोधकांकडे विधानसभेचे उपाध्यक्ष पद असावे. भाजपा आणि शिवसेनेच्या काही चुकांमुळे ही परंपरा खंडित झाली होती. त्यामुळे ही परंपरा पुन्हा सुरू करावी आणि उपाध्यक्षपद मिळावे, अशी विनंती आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली, असेही भास्कर जाधव म्हणाले. तसेच विधानसभा अध्यक्ष बिनविरोध व्हावा ही परंपरा राहिली आहे. विरोधीपक्ष नेता यासंदर्भात व्यवस्था असली पाहिजे. दिल्लीत आपने भाजपाचा विरोधी पक्षनेता करण्यास सहमती दिली. ही भूमिका आम्ही मांडली, असे नाना पटोले यांनी सांगितले.