22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्र‘मविआ’ हाच मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा

‘मविआ’ हाच मुख्यमंत्रिपदासाठी चेहरा

काँग्रेसच्या बाजूनेच सर्वांत जास्त मते : नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी
लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपताच आता सा-यांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले आहेत. अशातच जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षांनी आपली तयारी सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने महायुतीला शह देण्यासाठी महाविकास आघाडीनेही आपली कंबर कसली आहे. दरम्यान काँग्रेसने आज आसूड मोर्चाचे आयोजन केले असून या मोर्चातून सत्ताधारी महायुतीला विविध मुद्यांवरून घेरण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून केला जात आहे.

अशातच संविधानाला धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीही कारभार केला नाही. अमित शहा यांनी सर्व खोटे नॅरेटिव्ह सेट केले आणि खोट्या नॅरेटिव्हचे मास्टरमाईंड अमित शहा आणि भाजपच असल्याचा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. सोबतच सध्या राज्यात काँग्रेसच्या बाजूला जास्त मते आहेत, पण काँग्रेस कोणताही मीपणा करणार नाही.

आम्ही सर्व पूर्ण ताकदीने आणि एकदिलाने महाविकास आघाडीला सोबत घेऊन पुढे जाणार आहोत. परिणामी मुख्यमंत्रिपदासाठी महाविकास आघाडी हाच खरा चेहरा असल्याचे सूतोवाच देखील नाना पटोले यांनी केले आहे. ते रत्नागिरी येथे बोलत होते.

खोट्या नॅरेटिव्हचे मास्टरमाईंड भाजपच-नाना पटोले

महाराष्ट्राला विकण्याचे काम सध्या सरकार करत आहे. त्यामुळेच आम्ही काँग्रेसचा आसूड मोर्चा आयोजित केला आहे. सत्तेत आल्यानंतर देखील भाजप पहिल्या दिवसापासून निवडणुकीच्या प्रचारात असते. भाजप हे प्रचारक त्यामध्ये काही विशेष नाही. महाराष्ट्रामध्ये किती प्रॉपर्टी अजून विकायची आहे हे पाहण्यासाठी अमित शहा, नरेंद्र मोदी महाराष्ट्रामध्ये सतत येतात. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचा स्वाभिमान विकण्याचे काम सध्या सुरू आहे. संविधानाला धरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कधीही कारभार केला नाही. अमित शहा यांनी सर्व खोटे नॅरेटिव्ह सेट केले आणि खोट्या नॅरेटिव्हचे मास्टरमाईंड अमित शहा आणि भाजपच आहेत.

राज्याला विकण्याचे काम
महाराष्ट्राला विकण्याचे काम हे सरकार करत आहे. सर्व कंट्रोल गुजरातचा आहे. त्यामुळे सत्ताधा-यांना सतत दिल्लीला जावे लागत आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या होणा-या दिल्ली दौ-यांबाबत नाना पटोले यांनी ही टीका केली आहे. सोबतच महायुतीमध्ये सध्या महाभारत सुरू असून यापुढे काय काय होते ते पहा, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

वाघनखांबाबत खोटा प्रचार
भाजप आणि महायुती सरकारने वाघनखांबाबत देखील खोटा प्रचार केला. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अद्यापही उभे राहिले नाही. या सर्व पिलावळीला सत्तेतून बाहेर काढणे हाच आमचा उद्देश असल्याचेही नाना पटोले म्हणाले. महाविकास आघाडीचे जागावाटप ऑगस्टमध्ये होईल आणि सप्टेंबरमध्ये उमेदवार देखील जाहीर होणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.

उच्चपदस्थ नेत्यांकडून कारवाई
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसची मतं फुटल्याचे बघायला मिळाले. परिणामी काँग्रेसच्या उच्चपदस्थ नेत्यांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. याविषयी बोलताना नाना पटोले म्हणाले की, येत्या काही दिवसांमध्ये विधानसभा निवडणुका होतील. त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की आम्ही काय कारवाई केली ते. विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आमदारांनी केलेल्या क्रॉस वोटिंगबाबत नाना पटोले यांनी हे विधान केले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR