मंगळवारपासून आंदोलन, तिस-या दिवशी पाणीही त्यागणार
बीड : प्रतिनिधी
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला २ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला. या प्रकरणी ७ आरोपींना अटक करून मोक्का लावला आहे. मात्र, यातील एक आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. त्याला लवकर अटक करावी आणि हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावे यांसह विविध मागण्यांसाठी मस्साजोग ग्रामस्थ मंगळवारी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. २ दिवसांत दखल घेतली नाही तर पाणीसुद्धा पिणार नाही, असा इशारा ग्रामस्थांनी दिला. यात शिष्टमंडळाने दखल घेतली तर आंदोलन मागे घेऊ, असेही ग्रामस्थ म्हणाले.
संतोष देशमुख हत्येप्रकरणी मस्साजोगचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर उद्या मंगळवार २५ फेब्रुवारी २०२५ रोजी अन्नत्याग आंदोलन करणार आहेत. संपूर्ण गाव अन्नत्याग आंदोलन करणार आहे. सकाळी १० वाजल्यापासून या आंदोलनाला सुरुवात होईल. दोन दिवस आम्ही अन्नत्याग करणार आहोत. तिस-या दिवसापासून आम्ही पाण्याचा त्याग करणार आहोत, असा आक्रमक पवित्रा ग्रामस्थांनी घेतला आहे.
शिष्टमंडळाचे ठोस आश्वासन हवे
पोलिस अधीक्षक साहेबांसोबत चर्चा झाली ती सकारात्मक होती. काही गोष्टी त्यांच्यापर्यंत गेल्या नाहीत. पुन्हा चौकशी करण्यासाठी आम्ही लवकरच अर्ज देणार आहोत. गावक-यांनी जो अन्नत्यागाचा पवित्रा घेतला आहे त्याच्याशी मी सहमत आहे. जोपर्यंत शिष्टमंडळ येत नाही आम्हाला आश्वासन देत नाही, तोपर्यंत हे आंदोलन सुरू असेल, असे धनंजय देशमुख म्हणाले.
पाण्याचा त्यागही करणार
ज्यांना आम्ही सहआरोपी म्हणतो, ज्यांच्या बाबतीत सबळ पुरावे आहेत, त्यांना आरोपी का करत नाहीत, असा सवाल गावक-यांनी उपस्थित केला. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हा लढा सुरूच राहणार आहे. मंगळवारपासून २ दिवस ग्रामस्थांचा अन्नत्याग आणि त्यानंतर तिस-या दिवशी पाण्याचाही त्याग केला जाणार आहे, असे ग्रामस्थ म्हणाले.