25.4 C
Latur
Saturday, February 15, 2025
Homeमहाराष्ट्रमहाकुंभमेळ्यामध्ये अजूनही २ हजार नागरिक बेपत्ता?

महाकुंभमेळ्यामध्ये अजूनही २ हजार नागरिक बेपत्ता?

खासदार संजय राऊतांचा दावा

मुंबई : महाकुंभमेळ्यामध्ये २ हजार हून अधिक नागरिक बेपत्ता आहेत. आमचा आरोप आहे ते मेले आहेत. सरकार हे लपविण्याचा प्रयत्न करीत आहे. संसदेत मी प्रश्न विचारला तर माझा माईक बंद केला गेला. एकनाथ शिंदे यांचा पक्ष अमित शहा यांच्या मालकीचा आहे. ते सांगतील ते एकनाथ शिंदे बोलणार. त्यांना सध्या पक्ष चालवायला दिला आहे,’ अशी टीका खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिवारासह प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी होत अमृतस्नान केले. यावरून टीका करताना संजय राऊत म्हणाले की, ‘कुंभमेळ्यात सर्वांनी जायला पाहिजे. देवेंद्र फडणवीस गेले त्यात चुकीचे काही नाही. पण किती लोक मेले हे सांगण्यासाठी ते अजूनही तयार नाहीत.

राज्यामध्ये ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महायुती सरकारने याचा शासन निर्णय जारी केला आहे. महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी (दि.१४) राज्याचे पोलिस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. यामुळे आता विरोधकांनी टीकेची झोड उठवण्यास सुरुवात केली आहे. लव्ह जिहादच्या नावाने वातावरण खराब करत आहेत, असा आरोप ठाकरे गटाचे नेते व खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

मुंबईमध्ये संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी लव्ह जिहादच्या निर्णयावर टीका केली आहे. खासदार राऊत म्हणाले की, हे सरकार कामाच्या नावावर मते मागू शकत नाही. फसवणूक करून, निवडणूक आयोगाला हाताशी धरून विजय मिळवतात. त्यामुळे हे अशा घोषणा करत राहणार. लव्ह जिहादच्या नावाने वातावरण खराब करीत आहेत. भाजपाकडील काही भाषण माफिया हे ठरवणार का? लव्ह जिहाद झाला म्हणून, असा घणाघात खासदार राऊत यांनी केला आहे.

भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी भाजपच्या सत्ताधारी नेत्यांना निधी मिळणार असल्याचे वक्तव्य केले होते. याबाबत संजय राऊत म्हणाले की, ‘सरपंच आमच्या पक्षाचा नाही. त्यांना विकास निधी देणारा नाही असे विधान एक मंत्री करतो. पैसा यांच्या बापाचा आहे का? पैसा जनतेचा आहे. मंत्रिपदाची शपथ घेताना कोणासोबत द्वेषभावना ठेवणार नाही असे बोलतात. पण त्याविरोधात काम करतात. हा संविधानाचा अपमान करत आहेत, असा घणाघात खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

याचबरोबर आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडे यांची भेट झाली आहे. आरोप-प्रत्यारोपानंतर चार तास बंद दाराआड चर्चा केल्यामुळे टीकेची झोड उठवली आहे. यावर खासदार राऊत म्हणाले की, ‘‘आमदार सुरेश धस हे कधीही पलटी मारतील. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे. एका विद्यमान आमदाराने देशमुख कुटुंबियांच्या अश्रूंचा बाजार मांडला आहे. धस यांनी ही कृती केली असेल तर देव त्यांना क्षमा करणार नाही. ते पाप आहे. विश्वासघात यापेक्षा पुढचे पाऊल आहे. बीडमधील काही नेत्यांनी मला धस यांच्यावर विश्वास ठेवू नका असे सांगितले होते. मला अजून अपेक्षा आहे धस असे काही करणार नाहीत,’ अशा शब्दांत संजय राऊतांनी निशाणा साधला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR