लातूर : प्रतिनिधी
प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यात आंघोळ करणा-या महिलांचे व्हिडीओ ऑनलाईन अपलोड करुन सविस्तर व्हिडीओ पाहण्यासाठी पैसे भरा, असे सांगुन फसवणुक करणा-या व लातूर येथे नीट परीक्षेची तयारी कणा-या सांगली जिल्ह्यातील जत येथील प्रज्वल अशोक तेली या विद्यार्थ्याला गुजरात पोलिसांनी लातूर पोलिसांच्या मदतीने अटक केली.
प्रयागराज येथे महाकुंभ मेळावा सुरु आहे. देशभरातील लाखो महिला-पुरुष संगमावर पवित्र स्नान करण्यासाठी जात आहेत. संगमावर आंघोळ करतानाचे महिलांचे व्हिडीओ मिळवून असे व्हिडीओ सोशल मिडियावर टाकुन यातून आणखी दृश्य पाहायचे असतील तर अमुक-तमुक रक्कम भरा, असे आवाहन करुन लुट केली जात होती. शिवाय काही हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही हॅक करुन तेथील महिलांचे व्हिडीओ हस्तगत करुन फॉलोअर्सला विकण्याचा प्रकार काही तरुण करीत असल्याबाबत अहमदाबाद (गुजरात) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे वृत आहे.
शुक्रवारी गुजरात पोलिसांनी मुळचा सांगली जिल्ह्यातील जत येथील पण लातूर येथे नीट परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या प्रज्वल अशोक तेली या विद्यार्थ्यास लातूर पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. प्रज्वल हा लातूरच्या नारायणनगर भागात राहात होता, अशी माहिती आहे. या गुन्ह्यात गुजरात पोलिसांनी प्रयागराज येथून इतर दोघांना अटक केल्याचे वृत्त आहे.