31.4 C
Latur
Thursday, April 17, 2025
Homeमहाराष्ट्रमहागाई वाढली म्हणून बोंबा मारणारे गप्प का?

महागाई वाढली म्हणून बोंबा मारणारे गप्प का?

इंधन दरवाढीवर रोहित पवारांची टीका

अहिल्यानगर : प्रतिनिधी
काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे भाव ११० डॉलर असायचे तेव्हा पेट्रोलचे भाव ८० रुपये लिटर असताना महागाई वाढली म्हणून बोंबा मारणारी भाजपा आज कच्च्या तेलाच्या किमती ७४ डॉलर असताना पेट्रोलचे भाव १०५ रुपयांच्या पुढे गेल्यावर देखील गप्प का? अशी खरमरीत टीका आमदार रोहित पवार यांनी सरकारवर केली आहे.

दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून निर्णयांचा धडाका लावला आहे. अमेरिकेतील बेकायदेशीर स्थलांतरित नागरिकांना त्यांच्या मूळ देशात पाठवण्याचा निर्णय असेल किंवा नुकताच घेतलेला आयात शुल्काचा (टॅरिफ) निर्णय यामुळे ट्रम्प सध्या जगभरात चर्चेत आहेत.

पण टॅरिफच्या निर्णयाचा परिणाम शेअर बाजारावर झाल्याने काल, सोमवारी निर्देशांक आणि निफ्टीमध्ये मोठी घसरण नोंदवली गेली. अशातच मोदी सरकारने गॅस सिलिंडरच्या दरात ५० रुपयांची वाढ करतानाच, पेट्रोल-डिझेलच्या अबकारी करात दोन रुपयांची वाढ केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी यासंबंधी सोशल मीडियावर पोस्ट करत, त्याला ‘वाचा आणि थंड बसा’ असा हॅशटॅग दिला आहे.

मोदी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमतीत वाढ केल्यामुळे सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. केंद्र सरकारने १४.२ किलो एलपीजी सिलिंडरच्या किमतीत ५० रुपयांची वाढ केली आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने सोमवारी पेट्रोल आणि डिझेलवरील अबकारी करात २ रुपयांची वाढ केली. नव्या करानुसार, पेट्रोलवरील प्रति लिटर १३ रुपये आणि डिझेलवर १० रुपये अबकारी कर आकारण्यात येत आहे. पण यामुळे सर्वसामान्यांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार नाही, असा दावा केंद्र सरकारने केला आहे.

मार्च महिन्यात कच्च्या तेलाची ८४ डॉलर प्रति बॅरल असणारी किंमत एप्रिल महिन्यात ७४ डॉलर प्रति बॅरलपर्यंत खाली उतरत असेल तर देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्या पाहिजेत की वाढल्या पाहिजेत?

कच्च्या तेलाच्या किमती कमी होताच या लुटारू सरकारने पेट्रोल-डिझेलवरील एक्साईज ड्युटीमध्ये दोन रुपयांची वाढ केली, घरगुती गॅस सिलिंडरमध्येही ५० रुपयांची वाढ केली. सामान्य जनतेला ‘अच्छे दिन’ दाखवण्याची थोडी जरी भावना सरकारमध्ये असती तर कच्च्या तेलाच्या उतरलेल्या किमतीचा दिलासा सर्वसामान्यांनाही दिला असता, असे त्यांनी सुनावले आहे. काँग्रेसप्रणीत यूपीए सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे भाव ११० डॉलर असायचे तेव्हा पेट्रोलचे भाव ८० रुपये लिटर असताना महागाई वाढली म्हणून बोंबा मारणारी भाजपा आज कच्च्या तेलाच्या किमती ७४ डॉलर असताना पेट्रोलचे भाव १०५ रुपयांच्या पुढे गेल्यावर देखील गप्प का? असा प्रश्नही त्यांनी केला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR