सोलापूर : थकीत मिळकत कर वसुलीसाठी महापालिका मालमत्ता कर विभागाच्या पथकांकडून शहर आणि हद्दवाढ भागात जोरदार मोहीम सुरू आहे. मिळकत कर थकबाकीपोटी गाळा सील तर ५ नळ बंद करण्यात आले आहेत.
दरम्यान, महापालिका आयुक्त शितल तेली-उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनपूर्वक ही मोहीम सुरू आहे. ही मोहीम सुरू असतानाच गेल्या १२ दिवसातील मोहिमेत थकबाकी मिळकतदारांनी ५ कोटी रुपयांपेक्षा अधिक कर जमा केला आहे. यामध्ये धनादेशाचा समावेश आहे.
चालू आर्थिक वर्षासह मागील मिळकतकराची तब्बल ५०० कोटी अधिकची थकबाकी मिळकतदारांकडे आहे. चालू आर्थिक वर्ष मार्च अखेरपर्यंत महापालिका प्रशासनाने मालमत्ता कर विभागाला ५० टक्केहून अधिकच्या वसुलीचे उद्दिष्ट दिले आहेत. यावरून विभागाने शहरातील ५० पेठांमध्ये विशेष पथकाद्वारे वसुली आणि कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली आहे.
दरम्यान, गेल्या १२ दिवसातील मोहिमेत या पथकांच्या कारवाईला टाळून थकबाकी मिळकतदारांनी सुमारे ५ कोटी रुपयांहून अधिकचे कर जमा केला आहे. दररोज थकबाकीदारांकडून ४० ते ५० लाखाची वसुली होत असल्याची माहिती विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांनी दिली.
शहरातील पश्चिम मंगळवार पेठ, दक्षिण सदर बाजार आणि विजापूर रोड येथे मोठ्या प्रमाणात वसुली आणि कारवाई मोहीम राबविण्यात आली. या परिसरातून देखील मोठ्या प्रमाणात थकबाकी वसूल करण्यात आली आहे. तर थकीत कर न भरणाऱ्या पश्चिम मंगळवार पेठेतील मनोहर नेहमीचंद गुळेचा वगैरे यांच्या ४ लाख ६१ हजार ५१५ रुपयांच्या थकबाकी पोटी त्यांची मालमत्ता सील करण्यात आली आहे.
याचबरोबर दक्षिण सदर बाजार परिसरातील मधुमती गोविंद बिराळकर यांच्या १ लाख ३३ हजार ४५४ रुपये, गुणवंत महादेव बनसोडे यांच्या ९६ हजार ९३१ रुपये आणि जाफर मक्तुम पटेल यांच्या १ लाख ५२ हजार ८८७ रुपयांच्या थकबाकी पोटी त्यांच्या मिळकतीतील नळजोड तोडण्यात येऊन त्यांचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे. याचबरोबर विजापूर रोड येथील तात्या मशाबा भोरे यांच्या १ लाख ६६ हजार ३८७ रुपये आणि देविदास सत्वजी थोरे यांच्या २ लाख २१ हजार १८७ रुपयांच्या थकबाकीपोटी त्यांच्या मिळकतींमधील नळजोड तोडण्यात आला