बुलडाणा : बियाणे खरेदी करताना अनेकदा शेतक-यांची फसवणूक केली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत. असाच प्रकार बुलडाणा जिल्ह्यात समोर आला असून महाबीजकडूनच ही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. कारण सीड्स उत्पादन करण्यासाठी दिलेले बियाणे दुस-याच जातीचे निघाले आहे. यामुळे शेतक-याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप करण्यात येत आहे.
बुलडाणा जिल्ह्याच्या वर्दाडा येथील शेतकरी किसन आसाबे आणि अशोक आसाबे यांनी आपल्या दहा एकर शेतात महाबीजकडून बीज उत्पादन कार्यक्रम अंतर्गत टअवर – ७२५ या जातीच्या सोयाबीन बियाणाची लागवड केली होती. त्यासाठी त्यांनी महाबीजकडे कागदपत्रांची पूर्तता करत १० बॅग सोयाबीन बियाणे सुद्धा विकत घेतले होते. ते सोयाबीन बियाणे पेरून साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला; तरीही महाबीजकडून एकही अधिकारी किंवा कर्मचारी सीड प्लॉट पाहण्यासाठी आला नव्हता.
सीड प्लॉट रिजेक्ट झाल्याचे कारण
दरम्यान सोयाबीन बियाणे काढण्यावर आले असता महाबीज म्हणते की तुमचा सीड प्लॉट रिजेक्ट झाला असून आम्ही ते सोयाबीन बियाणे घेऊ शकत नाही. कारण आम्ही ज्या टअवर-७२५ जातीचे सोयाबीन बियाणे दिले होते ते दुस-याच जातीचे सोयाबीनचे वाण आहे. अर्थात बियाणे लागवडीपासून आता काढणीपर्यंत शेतक-याने पिकाची निगा राखत उत्पादन घेतले आहे.
शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान
त्यामुळे शेतक-याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून यासंदर्भात शेतकरी किसन आसाबे आणि अशोक आसाबे यांनी महाबीज, कृषी विभागासह इतर ठिकाणी तक्रारी केल्या असून तत्काळ न्याय द्यावा आणि नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यासंदर्भात महाबीज अधिकारी यांना विचारणा केली असता अधिकारी म्हणतात की कृषी विभागाचा अहवाल आल्यावर पुढील कारवाई करण्यात येईल आणि अहवाल वरिष्ठांकडे पाठवण्यात येईल.