लातूर : प्रतिनिधी
बुद्धगया येथे सुरु असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या समर्थनात लातूर शहरात तीन दिवसीय धरणे आंदोलनाची पु. भिक्खु संघाच्या उपस्थितीत सुरुवात करण्यात आली. दि. ३ ते ५ मार्चदरम्यान दररोज सकाळी १०.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत येथील महात्मा गांधी चौक येथे चालणार असल्यचे पु. भिक्खु पय्यानंद थेरो यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
या तीन दिवसीय धरणे आंदोलनाचा पहिल्या दिवशी सोमवारी सकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार घालून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क ते महात्मा गांधी चौकापर्यंत मिरवणूक काढण्यात आली. तद्दनंतर महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून या तीन दिवसीय धरणे आंदोलनास सुरुवात झाली. यावेळी पु. भिक्खु पय्यानंद थेरो, पु. भिक्खु नागसेन बोधी थेरो, पु. भिक्खु धम्मसार थेरो, भंते बुद्धशील, सर्व भिक्खूगण व लातूर शहरातील सकल बौद्ध समाजातील बंधू-भगिनी, युवा-युवती, विविध सामाजिक पक्ष संघटना, भारतीय बौद्ध महासभा, त्रिरत्न महासंघ, उपासक उपासिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
१९४९ महाबोधी अॅक्ट महाविहारासाठी लागू करण्यात आला. परंतु या अॅक्टव्दारे महाविहाराचा संपूर्ण अधिकार बौद्धांना देण्यात आले नाही. यामुळे विहाराच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करुन विहाराचे विदृपीकरन करण्यात आले आणि आजही महंताव्दारे विहाराबाबत खोटा आणि खोडसाळ प्रचार करण्याचे काम होत आहे. महाबोधी अॅक्ट १९४९ रद्द करून नविन कायदा बनविण्यात यावा व महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे. ही प्रमुख मागणी असल्याचे यावेळी पु. भिक्खु पय्यानंद थेरो यांनी प्रतिपादन केले.