मुंबई : प्रतिनिधी
अजित पवार खुद के गिरेबान में झांक के देखीये. ते नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेल्या पक्षाबद्दल बोलत आहेत. आरोप-प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवले पाहिजे. आम्ही आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे, अशी टीका करत भाजपचे नेते रवींद्र चव्हाण यांनी पुण्यातील अजित पवार यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असतानाच, ६७ जागांवर झालेल्या बिनविरोध निवडींनी नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजपच्या सर्वाधिक ४५ उमेदवारांनी बिनविरोध बाजी मारल्यानंतर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर शंका उपस्थित करत भाजपच्या रणनीतीवर सडकून टीका केली. तसेच भाजप सत्ताकाळात दिवसाढवळ्या लुटणा-यांची टोळीच तयार झाल्याचेही अजित पवार म्हणाले. यामुळे निवडणुकीपूर्वीच महायुतीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. दुसरीकडे भाजपकडूनही अजित पवार यांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
रवींद्र चव्हाण म्हणाले, महायुतीतील घटक पक्ष असणारे अजित पवार यांनी विधान करताना विचारपूर्वक करावे. अनेक वर्षे महाविकस आघाडीत तुम्ही इथे होता तेव्हा काम करायला हवे होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व बरोबर नाही एवढे त्यांनी सांगावे असेही रवींद्र चव्हाण म्हणाले.
शुक्रवारी राष्ट्रवादी (अजित पवार) चे अध्यक्ष, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडला. यावेळी अजित पवार यांनी भाजपच्या कारभारावर ताशेरे ओढले. माझ्यावर सत्तर हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता; पण ज्यांनी आरोप केले, त्यांच्याच सोबत आज मी सरकारमध्ये काम करतो आहे. महापालिकेत आम्ही कामाची माणसे आहोत. मात्र, भाजपमध्ये सध्या दिवसाढवळ्या लुटणा-यांची टोळी तयार झाली, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. पवार यांच्या टीकेनंतर महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा राजकीय स्तरातून होत आहे.
अजित पवारांचा वेगळा मार्ग दिसतोय : संजय राऊत
अजित पवारांनी महापालिकेनिमित्त भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्याबद्दल विचारले असता संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांचा वेगळया मार्गाने जाण्याचा इरादा दिसत आहे. ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याचा आरोप आम्ही केला नव्हता. भाजपाच्या भोपाळ येथील मेळाव्यात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच सिंचन घोटाळ्याचा आरोप केला होता. त्यानंतर आठ दिवसांनी अजित पवार मंत्रिमंडळात सामील झाले. ‘‘अजित पवार भाजपावर भ्रष्टाचाराचे आरोप करत असतील तर ते सरकारमध्ये का राहिले आहेत? त्यांनी शरद पवारांबरोबर परत आले पाहिजे’’, असा सल्ला संजय राऊत यांनी दिला.

