भाजप-शिंदे गटात धुसफूस, शिंदे बैठकांपासून दूर
मुंबई : प्रतिनिधी
महायुती सरकारमधील मित्रपक्षांमधील धुसफूस वाढू लागली आहे. सत्तास्थापना, खातेवाटप, पालकमंत्रिपद यानंतर आता वॉर रुम विरुद्ध समन्वय केंद्र असे शह- काटशहाचे राजकारण पाहायला मिळत आहे. राज्यातील सगळ््या प्रकल्पांवर नजर ठेवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात वॉर रुम सुरू केली. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समन्वय केंद्र सुरू करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शिंदे मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या बैठकांना गैरहजर राहत आले. आता त्यांनी स्वत:चे समन्वय केंद्र सुरू केले. यातून शिंदे त्यांच्याकडे आणि शिवसेनेच्या मंत्र्यांकडे असलेल्या विभागांच्या प्रकल्पांचा आढावा घेणार आहेत. यावरून आता नव्याने वॉर सुरू झाल्याची चर्चा आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याचा इन्कार केला.
मुख्यमंत्री फडणवीस मंत्रालयातील वॉर रुममधून राज्यभरात सुरु असलेल्या पायाभूत प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतात. विविध मंत्रालयांच्या अखत्यारित येणा-या प्रकल्पांच्या प्रगतीवर लक्ष ठेवण्यासाठी फडणवीसांनी वॉर रुम सुरु केली आहे. यानंतर आता उपमुख्यमंत्री शिंदे नगरविकास, म्हाडा, एसआरएससह अन्य विभागांकडून राबवण्यात येणा-या प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी समन्वय केंद्राची उभारणी करत आहेत. दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रकल्पांवर देखरेख ठेवण्यासाठी प्रोजेक्ट मॉनिटरिंग युनिट स्थापन केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांकडे असलेल्या विभागांच्या प्रकल्पांचा आढावा या युनिटच्या माध्यमातून घेतला जातो. त्यामुळे आता मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री विविध प्रकल्पांवर स्वतंत्रपणे देखरेख ठेवत असल्याचे दिसून येत आहे.
समन्वयासाठी वॉर रूम : सामंत
एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत. ते मुख्यमंत्री होते. अजितदादांची पण वॉर रुम आहे. शिंदे साहेबांनी एखादी गोष्ट केल्यावर त्याची बातमी झालीच पाहिजे, अशी परिस्थिती आहे. प्रकल्प लवकर मार्गी लागावेत, यासाठी को-ऑर्डिनेशन रुम तयार करण्यात येत आहे. त्यामुळे सर्वांनी याचे स्वागत करायला पाहिजे, असे मंत्री उदय सामंत म्हणाले.