मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिस-यांदा पंतप्रधान बनविण्यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्यात महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. त्यानंतर राज ठाकरे यांनी मनसेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते महायुतीच्या उमेदवारांचा प्रचारही करणार असल्याचे जाहीर केले आहे.
मुंबईत राज ठाकरेंनी पक्षाचे प्रमुख नेते आणि पदाधिकारी यांची बैठक बोलावली होती मात्र राज ठाकरे यांची ही भूमिका पक्षातील प्रमुख नेत्यांना तसेच पदाधिकारी यांना आवडलेली दिसत नाही.
काही दिवसांपूर्वी, पनवेलमधील काही मनसे पदाधिका-यांनी ठाकरे गटात प्रवेश केला. कोकणातील मनसे संपवण्याचे काम करणा-या सुनील तटकरे यांचे काम आम्ही कसे करू अशी भूमिका सरचिटणीस वैभव खेडकर यांनी जाहीरपणे मांडून कोकणातील मनसे कार्यकर्त्यांच्या भावना व्यक्त केल्या. तर आता पक्षाचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनीही पक्षाला रामराम ठोकला आहे.
यापूर्वीही राज ठाकरे यांच्या गुढीपाडवा मेळाव्यातील भूमिकेनंतर मनसेचे सरचिटणीस कीर्तीकुमार शिंदे यांनी राजीनामा दिला. ‘अलविदा मनसे’ म्हणत कीर्तीकुमार शिंदे यांनी मनसेला अखेरचा जय महाराष्ट्र केला आहे.