-प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवरायांचे मंदिर बांधणार
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील महायुती सरकारने भ्रष्टाचाराची परिसीमा गाठली आहे. दोन महिन्यांनी राज्यात आमचे सरकार येईल तेव्हा सरकारच्या सर्व निर्णयांची चौकशी केली जाईल. अडाणीला दिलेला धारावी पुनर्विकास प्रकल्प रद्द केला जाईल, अशी घोषणा शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. शिवसेनेच्या बळावर मोठ्या झालेल्या भाजपाला महाराष्ट्राच्या मातीत गा निर्धार करताना, आपले सरकार आल्यानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यात छत्रपती शिवरायांचे मंदिर बांधण्याची घोषणा त्यांनी केली.
दस-याच्या निमित्ताने आज शिवसेनेच्या दोन्ही गटांचे मेळावे झाले. उद्धव ठाकरे यांच्या गटाचा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर झाला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकले. केंद्रीय यंत्रणांसह सर्व शक्ती पणाला लावून दिल्लीकरांनी शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. देशात दुसरा कोणताही पक्ष शिल्लक ठेवायचाच नाही, असे भाजपने ठरवले आहे. तीन सर न्यायाधीशांची कारकिर्द संपली पण निकाल लागलेला नाही. परंतु शिवसैनिक माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याने ते शक्य झाले नाही. गद्दारांना आणि चोरांना नेता बनवून आमच्याशी लढावे लागते, यातच भाजपचा पराभव असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
महायुती सरकारने भ्रष्टाचाराचा कळस केला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यातही पैसा खाल्ला, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. आपले सरकार आल्यानंतर याची चौकशी केली जाईल असे उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीने त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून जाहीर केले नसले तरी आपल्याच नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येईल असे संकेत उद्धव ठाकरे यांनी दिले. मुंबईसह राज्य अडणीच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र कोणत्याही फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र अडाणी – अंबानींचा होऊ देणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. सरकार आल्यानंतर सर्वात आधी धारावीचे टेंडर रद्द करणार. त्याठिकाणी पोलिस, गिरणी कामगार आणि मुंबईतील मराठी माणसाला जागा देणार असे ते म्हणाले.