नांदेड/नायगाव : प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळणे अंत्यत दुर्दैवी असून सत्ताधारी आणि उपमुख्यमंत्र्यांनी माफी मागून चालणार नाही. हा महाराष्ट्राच्या दैवताचा हा अपमान आहे, यामुळे या लोकांनी सत्तेतून बाहेर पडावे अशी मागणी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी गुरूवार दि. २९ ऑगस्ट रोजी येथे केली.
दिवगंत खा. वसंतराव चव्हाण यांच्या कुंटुबियांचे सात्वंन करण्यासाठी पटोले गुरूवारी सायंकाळी नांदेडात आले होते. यावेळी विमानतळावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पटोले म्हणाले की, राज्यातील सत्ताधारी केवळ कमिशनसाठी काम करीत आहेत. म्हणून अशा घटना घडत आहेत. यातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. आता सत्ताधारी माफी मागून मोकळे होत आहेत. परंतू जगात मान असलेल्या महाराष्ट्राच्या दैवताचा हा अपमान आहे. यामुळे या लोकांनी आता तातडीने सत्तेतून बाहेर पडावे, अशी मागणी केली.
मित्र पक्षांच्या सोबतीनेच विधानसभा लढणार
महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर बोलताना नाना पटोले म्हणाले की, राज्यातील विधानसभेच्या २८८ जागा आघाडी मित्र पक्षाला सोबत घेऊन लढणार आहे. यासाठी आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा होत आहे. यानंतर कोण किती जागा लढवेल हे ठरणार आहे असे सांगितले.
चेन्नीथला, पटोलेंनी घेतली खा. चव्हाण कुटुंबीयांची भेट
नांदेडचे दिवंगत खा. वसंतराव चव्हाण यांचे नुकतेच निधन झाले. यांच्या पार्थिवावर दि. २७ रोजी शोकाकुल वातावरणात अन्त्यसंस्कार करण्यात आले. निधनानंतर गुरूवारी सायंकाळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला व कॉग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी चव्हाण परिवाराची नायगांव (बा.) येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सांत्वन केले. यावेळी विधानपरिषदेचे माजी आ. वजाहत मिर्झा, आ. मोहन हबर्डे, माजी आ. हानंमतराव पा. बेटमोगरेकर, माजी महापौर अब्दुल सत्तार, बी. आर. कदम, शाम दरक यांचाही समावेश होता. तर गुरूवारी सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चव्हाण कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.