मुंबई : विशेष प्रतिनिधी
जवळपास १४ उत्तर भारतीय उमेदवार विविध पक्षांकडून मुंबईत निवडणूक लढवत आहेत. ज्यात काही जागांवर उत्तर भारतीय विरुद्ध उत्तर भारतीय अशी थेट लढत होत आहे. नवी मुंबई, मालेगाव, औरंगाबाद, भिवंडीसारख्या भागातही उत्तर भारतीय नेते निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. भाजपने त्यांचा सुरक्षित गड मानला जाणा-या बोरिवलीत संजय उपाध्याय यांना उमेदवारी दिली. त्याशिवाय वसईत स्रेहा दुबे पंडित यांना भाजपने तिकिट दिले. कलिना मतदारसंघात रामदास आठवले यांनी अमरजित सिंह यांना उमेदवारी दिली. गोरेगाव विधानसभेत भाजपने विद्या ठाकूर यांना तिस-यांदा तिकिट दिले.
भाजपचा मित्रपक्ष शिवसेना यांनी दिंडोशी मतदारसंघात माजी खासदार संजय निरुपम यांना उमेदवारी दिली. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीनेही उत्तर भारतीय उमेदवारांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. महाविकास आघाडीत काँग्रेसने चारकोप येथील मतदारसंघात उत्तर भारतीय नेते यशवंत सिंह यांना उमेदवारी दिली. याठिकाणी भाजपचे योगेश सागर आणि मनसेचे दिनेश साळवी यांच्याशी त्यांचा सामना होणार आहे. नालासोपारा मतदारसंघात संदीप पांडे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली. अणुशक्तीनगर जागेवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीने सना मलिक तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीने फहाद अहमद यांना उमेदवार बनवले. मानखुर्द शिवाजीनगर येथे समाजवादी पक्षाने अबु आझमी आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नवाब मलिक यांना तिकिट दिले. वांद्रे पूर्व येथे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून झिशान सिद्दीकी निवडणुकीत उभे आहेत.
उत्तर भारतीय मते कुणाला?
उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड या राज्यातील उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात मुंबईत राहतात. महाराष्ट्रात जवळपास ४० लाख उत्तर भारतीय मते आहेत जे वेगवेगळ्या मतदारसंघात विभागले गेले आहेत. मुंबईतील ३६ पैकी २२ मतदारसंघात उत्तर भारतीय मते निर्णायक आहेत. उत्तर प्रदेश, बिहारमधील १८ लाख स्थलांतरित आता मुंबईचे मतदार बनले आहेत. कलिना, कुर्ला, दहिसर, चारकोप, कांदिवली पूर्व, बोरिवली, मागाठणे, वर्सोवा, गोरेगाव, दिंडोशी, जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व यासह शहरातील विविध मतदारसंघात त्यांचा प्रभाव आहे.
मुंबईनंतर नवी मुंबई, ठाणे, कल्याण, पुणे, नागपूर, कोल्हापूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर, नाशिक येथेही उत्तर भारतीय मतदार आहेत. रोजगारासाठी बहुतांश उत्तर भारतीय महाराष्ट्रात स्थलांतरित झाला आहे. हे मतदार स्थानिक मुद्द्यांऐवजी राष्ट्रीय पक्षांना पसंती देतात. कृपाशंकर सिंह, संजय निरुपम, राजहंस सिंह यासारख्या उत्तर भारतीय नेत्यांनी काँग्रेसची साथ सोडून भाजपला साथ दिली. त्यामुळे मोठा मतदार भाजपकडे वळला. आता काँग्रेसमध्ये नसीम खान, उद्धव ठाकरे गटाकडून आनंद दुबे यासारखे उत्तर भारतीय चेहरे पुढे आले आहेत.