23.2 C
Latur
Tuesday, November 19, 2024
Homeधाराशिवमहाराष्ट्रातील ‘खोकासुर’ नष्ट होऊ दे

महाराष्ट्रातील ‘खोकासुर’ नष्ट होऊ दे

ठाकरेंचे तुळजाभवानीला साकडे

तुळजापूर : प्रतिनिधी
सध्या विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे. महाराष्ट्रातील खोकासुर आणि भ्रष्टासुरांची राजवट संपून महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेल अशी राजवट येऊ दे, असे साकडे मी तुळजाभवानीच्या चरणी घातले आहे, मला खात्री आहे, आई तुळजाभवानी आशीर्वाद देणारच.
अशी प्रतिक्रिया शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तुळजापूर दौ-यावर असताना पत्रकारांशी बोलताना पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

दरम्यान, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पैसे वाटल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणावर बोलताना ठाकरे म्हणाले, तुळजाभवानीच्या दर्शनाला येतानाही माझी बॅग तपासली गेली. बॅगेत तर काही सापडले नाही, विनोद तावडेंच्या बॅगेत पैसे सापडल्याचे आताच तुमच्याकडून समजले. तसेच काल अनिल देशमुख यांच्यावर जो हल्ला झाला, तो दगड तपासण्याचे काम कोणी करायचे होते? म्हणूनच मी आई तुळजाभवानीला साकडे घातले आहे, भ्रष्ट राजवट एकदा या राज्यातून खतम करून टाक, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

हॉटेल विवांता येथे तावडे पैसे वाटत असल्याचा आरोप बविआचे नेते हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी केला. बविआ कार्यकर्त्यांनी तावडेंचा व्हीडीओ शूट करत त्यांना रोखून धरले होते. तिथे काही डाय-या सापडल्या असून त्यात काही नोंदी असल्याचाही दावा केला जात आहे.

संजय राऊत काय म्हणाले?
भाजपचा खेळ खल्लास! जे काम निवडणूक आयोगानेच करायला हवे होते ते काम ठाकूर यांनी केले! निवडणूक आयोग आमच्या बॅगा तपासतो आणि इकडे शेपूट घालतो! असे ट्विट करत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्हीडीओ शेअर केला आहे.

हितेंद्र ठाकूर यांचा आरोप
विनोद तावडे यांना लाज वाटायला पाहिजे. माफ करा जाऊ द्या, असे म्हणत त्यांनी मला २५ फोन केले. जे नियमाने आहे, तशी कारवाई करावी. मला अगोदरच बातमी समजली होती, की तावडे ५ कोटी रुपये घेऊन येणार आहेत. त्यामुळे मी कार्यकर्त्यांना बोलवल्याचे हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR