कॉंग्रेस अधिवेशनात राहुल गांधींचा घणाघात
अहमदाबाद : वृत्तसंस्था
काँग्रेसचे ८४ वे अधिवेशन गुजरात राज्यातील अहमदाबाद येथे पार पडले. या अधिवेशनात काँग्रेसचे नेते तथा खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा आणि आरएसएसवर सडकून टीका केली. आम्ही जातीआधारित जनगणना करण्याची मागणी केली. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ती मान्य केली नाही. आम्ही सत्तेत आल्यावर जातीआधारित जनगणेचा कायदा मंजूर करू, असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा पुनरुच्चार करीत भाजपने कटकारस्थान करून महाराष्ट्रातील निवडणूक जिंकली, असा घणाघात केला.
देश आता यांना कंटाळला आहे. याची प्रचिती बिहारच्या निवडणुकीत येईल. भाजपाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक कशा पद्धतीने जिंकल्या हे तुम्ही तिथे जाऊन लोकांना विचारा. आम्ही निवडणूक आयोगाला महाराष्ट्राच्या मतदारांची यादी विचारत आहोत. ही यादी मागून आम्ही थकलो. पण अजूनही निवडणूक आयोग आम्हाला महाराष्ट्रातील मतदारांची यादी देत नाही, असा आरोपही राहुल गांधी यांनी केला. तसेच येणा-या काळात देशात बदल घडणार आहे. लोकांचे मत बदलत आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मला फक्त माझ्या कामात रस आहे. तेलंगाणात आम्ही क्रांतीकारी निर्णय घेतला. तेथे आम्ही जातीय जनगणना कर आहोत. आम्ही यासाठी सातत्याने पाठपुरावा करीत आहोत. या देशात दलित किती? मागास किती, मुस्लिम किती? आदिवासी किती, हे समजले पाहिजे. एकूणच देशाचा एक्सरे झाला पाहिजे, अशी मागणी मी केली. पण मोदीजी, आरएसएसने आम्ही जाती जनगणना करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितले, अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
वक्फ कायदा धार्मिक
स्वातंत्र्यावर हल्लाच
संसदेने मंजूर केलेला वक्फ सुधारणा कायदा हा धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला आहे आणि संविधानविरोधी पाऊल आहे. भविष्यात इतर अल्पसंख्याक समुदायांनाही लक्ष्य केले जाईल, अशी भीती राहुल गांधीनी व्यक्त केली. यासोबतच देशातील जनता भाजपला कंटाळली आहे. त्यामुळे आता बदल होणार आहे, असेही गांधी म्हणाले.
ट्रम्पच्या भूमिकेबद्दल
मोदी बोलत नाहीत
अग्निपथ योजनेचा उल्लेख करताना राहुल गांधी यांनी गरीब, दलित आणि आदिवासींना सैन्यात भरती होण्याच्या संधी काढून टाकल्याचे म्हटले. मोदीजी डोनाल्ड ट्रम्प यांना आपला मित्र म्हणतात. पण त्यांनी नवीन शुल्क लादण्याबद्दल मोदींनी एकही शब्द उच्चारला नाही, अशी टीका त्यांनी केली.
महाराष्ट्र विधानसभा
निवडणुकीत घोटाळा
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा घोटाळा झाला आहे. महाराष्ट्रात ५५ लाख मतदार कसे वाढले, असा सवाल उपस्थित करीत कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजप १५० जागा लढवते आणि त्यापैकी १३८ जागांवर विजय मिळतो. इतका मोठा रिझल्ट या देशात कधी पाहिला आहे का? हा घोटाळा लोकशाहीला नष्ट आणि तंग करण्यासाठी केला. पण आपल्याला या विरोधात लढायचे आहे, असे म्हटले. संपूर्ण जग ईव्हीएम पासून बॅलेट पेपरच्या दिशेला जात आहे. पण आपल्या देशात ईव्हीएमचा वापर केला जात आहे. ही सर्व फसवणूक आहे. भारतातही बॅलेट पेपरने निवडणुका व्हाव्यात, असे खर्गे म्हणाले.