19.6 C
Latur
Wednesday, January 15, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात मोदींचा पराभव ; जिथे सभा, तिथे हार...

महाराष्ट्रात मोदींचा पराभव ; जिथे सभा, तिथे हार…

मुंबई : प्रतिनिधी
दिल्लीत पुन्हा नरेंद्र मोदींची सत्ता येणार असली तरी महाराष्ट्राने मात्र त्यांना सपशेल नाकारले आहे. मोदींनी राज्यात तब्बल १८ सभा आणि एक रोड शो घेतला. पण मागील निवडणुकीत २३ खासदार असलेल्या भाजपला यावेळी दोन अंकी आकडाही गाठता आला नाही. तर महायुतीला केवळ १७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. महाराष्ट्रात मोदींच्या सभांना नेत्यांनी गर्दी खेचून आणली असली तरी मतदार केंद्रांपर्यंत मतदारांना आणता आले नाही.

दरम्यान, यंदाची लोकसभा निवडणूक म्हणावी तशी सोपी ठरली नाही. भाजप नेत्यांच्या भाषणांमध्ये मोदींचाच बोलबाला होता. पण मतदारांच्या मनात वेगळेच चालले होते, हे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. मुंबईपासून विदर्भापर्यंत मोदींनी ज्या ठिकाणी सभा घेतल्या, तिथे बहुतेक ठिकाणी मोदींच्या उमेदवारांचा पराभव केला.

मुंबई-कोकण लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईत अनेक चकरा झाल्या. तर प्रचारादरम्यान शिवाजी पार्कवर मोदींच्या उपस्थितीत महायुतीची विराट सभा झाली. उत्तर मध्य मतदारसंघात मोदींचा रोड शो झाला. पण या मतदारसंघासह मुंबईतील सहापैकी चार मतदारसंघांत महायुतीला केवळ दोनच जागा मिळू शकल्या. मुंबई उत्तरमधून पीयूष गोयल तर उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर यांचा काठावर विजय झाला. महायुतीसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

कोकणात मात्र महायुतीला चांगले यश मिळाले. विशेष म्हणजे कल्याण वगळता कोकणात मोदींची एकही सभा झाली नाही. सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे, रायगडमध्ये सुनील तटकरे, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे तर ठाण्यात नरेश म्हस्के यांचा विजय झाला.

पश्चिम महाराष्ट्र : मोदींनी पुण्यासह बारामती, शिरूर आणि मावळ अशा चार लोकसभा मतदारसंघांत सभा घेतल्या होत्या. पण पुणे जिल्ह्यातही महायुतीला पुणे आणि मावळ या दोनच जागा मिळू शकल्या. मोदींच्या सातारा, माढा, सोलापूर, कोल्हापूरमध्येही सभा झाल्या. या चारपैकी केवळ सातारा मतदारसंघात महायुतीला यश मिळाले. सातारामध्ये उदयनराजे भोसले, माढ्यात धैर्यशील मोहिते पाटील, सोलापुरात प्रणिती शिंदे आणि कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांचा विजय झाला.

उत्तर महाराष्ट्र : मोदींनी अहमदनगर, नाशिक, दिंडोरी, नंदुरबारमध्ये सभा घेतल्यानंतरही तिन्ही मतदारसंघांत महायुतीचा दारुण पराभव झाला. नगरमध्ये सुजय विखेंना राष्ट्रवादीच्या निलेश लंकेंनी पराभूत केले. नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा पराभव झाला.
दिंडोरीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार, नंदुरबारमध्ये हीना गावित यांचा पराभव झाला तर काँग्रेसचे गोवाल पाडवी यांचा दीड लाखाहून अधिक मतांनी विजय झाला.

मराठवाडा : मराठवाड्यातही मोदींची जादू कामी आली नाही. बीड, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव (उस्मानाबाद) या पाच मतदारसंघांत महायुतीच्या उमेदवारांसाठीही मोदींच्या सभा झाल्या. पाचही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे. अनुक्रमे पंकजा मुंडे, सुधाकर शृंगारे, प्रताप चिखलीकर, महादेव जानकर आणि अर्चना पाटील यांना पराभवाची चव चाखावी लागली.

विदर्भ : विदर्भात महायुतीला मोठा दणका बसला आहे. हा भाजपचा गड मानला जातो. पण केवळ नागपूर आणि अकोला वगळता सर्व आठ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. चंद्रपूर, रामटेक, वर्धा या मतदारसंघात मोदींच्या सभा झाल्या पंरतु चंद्रपूर राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार, वर्ध्यात रामदास तडस आणि रामटेकमध्ये राजू पारवे पराभूत झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR