34.6 C
Latur
Monday, March 31, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्रात ‘रोहयो’ची पीछेहाट 

महाराष्ट्रात ‘रोहयो’ची पीछेहाट 

  मजुरीचा सर्वाधिक दर हरियाणात  

अमरावती : प्रतिनिधी
  देशाला रोजगार हमी योजना देणा-या महाराष्ट्रात ‘रोहयो’ची पीछेहाट झालेली आहे. मजुरीच्या दरात हरियाणा इतर राज्यांच्या तुलनेत क्रमांक १ वर आहे. हरियाणात रोहयो मजुरीचा दर ४०० रुपये आहे. तर महाराष्ट्रात हा दर ३१२ रुपये आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या राजपत्रातून ‘रोहयो’चे देशभरातील वास्तव पुढे आले आहे.
महाराष्ट्रात दुष्काळ पडल्यानंतर रोजगार हमी योजनेची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. त्यानंतर २००५ मध्ये केंद्र सरकारने या योजनेला देशपातळीवर पोहोचविले. मात्र, ‘रोहयो’ची जननी असलेल्या महाराष्ट्रात बिकट अवस्था आहे. दिवसेंदिवस मग्रारोहयोच्या मजुरांची संख्या घटत आहे. सुमारे १ लाख कामे सेल्फवर ठेवण्यात आली आहेत. बिहार आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यात मजुरांची संख्या लक्षात घेता मजुरी दर अत्यंत कमी आहे.
   २६ हजार कामांवर १.७६ लाख मजूर
     ‘मनरेगा’अंतर्गत राज्यात सद्य:स्थितीत २५,९९३ कामे सुरू आहेत. यावर १,७६,३०१ मजुरांना रोजगार मिळाला आहे. यामध्ये सर्वाधिक ३,१८८ कामे अमरावती जिल्ह्यात, तर सर्वांत कमी ९ कामे धाराशिव जिल्ह्यात सुरू आहेत.  सर्वाधिक २१,७६६ मजूर परभणी जिल्ह्यातील १,८७४ कामांवर आहेत. योजनेंतर्गत पहिले १०० दिवसांचे पेमेंट केंद्र शासनाद्वारा व नंतरच्या दिवसांचे पेमेंट राज्य शासनाद्वारे दिले जाते.
 इतर यंत्रणेचे कंट्रोल काढले
पूर्वी रोहयो कामांचे नियोजन, नियंत्रण आणि व्यवस्थापन त्या-त्या शासकीय यंत्रणेकडे असायचे. मात्र, मध्यंतरी रोहयोचे नियंत्रण महसूलने हाती घेतल्यामुळे इतर विभागांनी या कामात रस दाखवणे कमी केले. विशेषत: कुशल कामांसाठी आवश्यक निधी वेळेवर मिळत नसल्याने अनेक योजनांवर परिणाम झाला. महसूल विभाग समोर येत नाही. परिणामी, ग्रामीण भागातील रोजगार संधी घटल्या आहेत.
 देशभरातील मजुरीचे दर
केंद्र शासनाच्या राजपत्रामध्ये ‘रोहयो’चे राज्यनिहाय दर जाहीर करण्यात आले आहेत. त्यानुसार हरियाणा ४०० रुपये, आंध्र प्रदेश ३०७ रुपये, अरुणाचल प्रदेश २४१ रुपये, आसाम २५६ रुपये, बिहार २५५ रुपये, छत्तीसगड २६१ रुपये, गोवा ३७८ रुपये, गुजरात २८८ रुपये, हिमाचल प्रदेश ३०९ रुपये, जम्मू-काश्मीर २७२ रुपये, लदाख २७२ रुपये, झारखंड २५५ रुपये, कर्नाटक ३७० रुपये, केरळ ३६९ रुपये, मध्य प्रदेश २६१ रुपये, महाराष्ट्र ३१२ रुपये, मणिपूर २८४ रुपये असा दर आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR