अहमदपूर : प्रतिनिधी
शेतीच्या विरोधात भाजपने काळे कायदे आणले, शेतक-यांनी विरोध केल्यावर ते कायदे रद्द केले. असाच कारभार राज्यात महायुतीने केला. यामुळे त्यांच्या काळात राज्यात शेतक-यांच्या आत्महत्येचे सत्र सुरु असून यासाठी सरकारने काहीही केले नाही. सध्या महाराष्ट्र अडचणीत आहे, या महाराष्ट्राला अडचणीतुन आपल्याला बाहेर काढायचे आहे, हे काम करण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणे आवश्यक आहे आणि हाच पर्यायही आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे स्टार प्रचारक माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी केले. अहमदपूर शहरातील निजवंतेनगर येथे दि. ५ नोव्हेंबर रोजी अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार विनायकराव किशनराव जाधव-पाटील यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची प्रचार शुभारंभ सभा झाली. त्याप्रसंगी माजी मंत्री आमदार अमित देशमुख बोलत होते.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमाताई अंधारे, परभणीचे खासदार संजय जाधव, लातूरचे खासदार डॉ.शिवाजी काळगे, माजी खासदार सुधाकरराव शृंगारे, ह. भ. प. किशन महाराज, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लातूर जिल्हाप्रमुख बालाजी रेड्डी, राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष संजय शेटे, लातूर शहर जिल्हाध्यक्ष राजा मणियार, सय्यद साजिद, निळकंठ मिरकले, पंडितराव धुमाळ, विलास पाटील चाकूरकर, दत्ता हेंगणे, डॉ. गणेश कदम, चंद्रकांत मद्दे आदिसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख पुढे बोलताना म्हणाले की, या परिसरातील शेतक-यांच्या उसाचा प्रश्न खूप जिव्हाळ्याचा आहे. मांजरा परिवार उसाचे एकही टिपरु शिल्लक ठेवणार नाही. शेतक-यांच्या उसाला मांजरा परिवाराप्रमाणे भाव देण्यात येईल, अहमदपूरमध्ये विद्यमान आमदाराने काहीच विकास केला नाही, त्यांना आता धडा शिकवा. महाविकास आघाडीच्या पाठीशी सर्वांनी खंबीरपणे उभे रहावे, शेतक-यांच्या शेतमालाला भाव नाही, सध्या सोयाबीनला भाव नाही, महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आल्यावर शेतक-यांच्या शेतमालाला भाव देण्यासाठी राज्यात कायदा करु, सामान्य माणसाला अभिप्रेत असलेले शासन आम्ही देऊ असे त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले की, महायुती सरकारने महाराष्ट्र, मुंबई विकायला काढली आहे. अहमदपूर, चाकूर तालुक्यातील विकास कामासाठी विनायक पाटील सक्षम असून ते अनुभवी आहेत, शेतक-यांच्या आत्महत्या अजूनही थांबलेल्या नाहीत. शेतीच्या विरोधात भाजपने काळे कायदे आणले, शेतक-यांनी विरोध केल्यावर ते कायदे रद्द केले. सध्या महाराष्ट्र अडचणीत आहे. या महाराष्ट्राला अडचणीतुन आपल्याला बाहेर काढायचे आहे, हे काम करण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचे ऐक्य आहे.
काँग्रेसचे स्टार प्रचारक माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांचे दि. ५ नोव्हेंबर रोजी दुपारी अहमदपूर-चाकूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार विनायकराव किशनराव जाधव पाटील यांच्या प्रचार सभेसाठी अहमदपूर नजिकच्या रुद्धा हेलिपॅड येथे आगमन झाले असता महाविकास आघाडी पदाधिका-यांकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.