21.3 C
Latur
Thursday, December 26, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राला पर्यटनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य बनवू

महाराष्ट्राला पर्यटनामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य बनवू

कराड : राज्याचा पर्यटन विकास आराखडा नव्याने तयार करणार असून, पर्यटनात महाराष्ट्र प्रथम क्रमांकाचे राज्य बनवणार असल्याची ग्वाही राज्याचे नवनिर्वाचित पर्यटन, खाणीकर्म व माजी सैनिक कल्याणमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेटमंत्री म्हणून नव्याने समावेश झाल्यानंतर शंभूराज देसाई हे प्रथमच आपल्या पाटण विधानसभा मतदारसंघाच्या दौ-यावर आले असता कराडमध्ये पत्रकारांशी बोलत होते.

शंभूराज म्हणाले, महाराष्ट्रात पर्यटनाला खूप मोठा वाव असल्याने जागतिक पर्यटन तज्ज्ञांची मदत घेऊन संपूर्ण राज्याचा नव्याने पर्यटन विकास आराखडा तयार करणार आहे. त्या आराखड्यानुसार महाराष्ट्राला पर्यटनात देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनवण्याचा आपला मानस आहे.

राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट म्हणून नव्याने शपथ घेतल्यानंतर कर्मभूमीत येत असताना, सर्वत्र उत्स्फूर्त झालेले स्वागत हे महायुतीवरील प्रेम मतदारांमधून व्यक्त होत असल्याचे मनस्वी समाधान आहे. एकनाथ शिंदे यांनी मला पुन्हा मंत्रिपदाची संधी दिली. माझ्याकडे पर्यटन, खाणीकर्म, माजी सैनिक कल्याण या खात्यांचा पदभार असून, या सगळ्या विभागांना न्याय देण्याचा माझा प्रयत्न असल्याची ग्वाही मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.

सातारा हा माजी सैनिकांचा जिल्हा अशी ओळख मिळवून असून, जिल्ह्यातील मिलिटरी अपशिंगे गावात घराघरातील एखाद दुसरी व्यक्ती सैन्य दलात असल्याने सर्वप्रथम आपण अधिका-यांसमवेत मिलिटरी अपशिंगेला भेट देणार आहे. या गावाच्या विकासासाठी वेगळे काय करता येईल याचा आराखडा तयार करणार असल्याचे मंत्री देसाईंनी सांगितले.

प्रतापगडचा विकास साधणार
प्रतापगड हा ऐतिहासिक किल्ला असून, गड संवर्धनाच्या उद्देशाने प्रतापगडचा आराखडा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच तयार करताना त्याला निधीही मिळाला आहे. आता प्रतापगड विकासाचा दुसरा टप्पा मार्गी लावण्यासाठी लगेचच पुरातत्त्व विभागाच्या अधिका-यांसह प्रतापगडची पाहणी करणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR