18.4 C
Latur
Saturday, January 25, 2025
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचा महायुतीचा कट

महाराष्ट्राला मद्यराष्ट्र करण्याचा महायुतीचा कट

मद्य कंपन्यांशी करारांवरून काँग्रेस आक्रमक भाजप दारूराष्ट्र बनवतेय : नाना पटोले

मुंबई : मुख्यमंत्र्यांनी दावोसमध्ये ज्या कंपन्यांशी करार केला त्यात दारू बनवणा-या हेनिकेन या कंपनीसोबत ७५० कोटी रुपयांचा करार केला आहे. तर एबी इन बीव्हीई या दुस-या बीअर उत्पादक कंपनीसोबत १५०० कोटी रुपयांचा करार केला आहे. भारतीय संविधानातील राज्याच्या धोरणात्मक तत्त्वांच्या अंतर्गत राज्याने आरोग्यास हानीकारक असलेल्या मादक पेये व औषधांचे वैद्यकीय कारणांशिवाय सेवन प्रतिबंधित करण्यासाठी प्रयत्न करावेत असे अनुच्छेद ४७ मध्ये म्हटले आहे. पण भाजपा सरकार दारूच्या कंपन्यांशी करार करून महाराष्ट्राला आता दारूराष्ट्र बनवायला निघाले आहे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी सरकारवर निशाणा साधला.

टिळक भवनातील पत्रकार परिषदेत नाना पटोले म्हणाले की, दावोसमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी करार केलेल्या ६१ कंपन्यांमधील ५१ कंपन्या भारतातीलच आहेत, यातील ४३ कंपन्या मुंबई-पुण्याच्या तर काही कंपन्यांची कार्यालये मंत्रालयापासून हाकेच्या अंतरावरच आहेत. फक्त दहा कंपन्या विदेशातील आहेत. सिडको आणि बुक माय शो यांच्यामध्ये दावोस येथे १५०० कोटी रुपयांचा करार करण्यात आला. कोल्ड प्ले च्या तिकिटविक्रीचा काळाबाजार केल्याप्रकरणी ‘बुक माय शो’ची मुंबई पोलिस चौकशी करत आहेत तर बोगस कागदपत्रे तयार करून पवईतील जयभीम नगरमध्ये तोडक कारवाई केल्याप्रकरणी चौकशी सुरू असलेल्या हिरानंदानी कंपनीसोबतही सरकारने करार केला आहे. या कंपनीने कर्मचारी भविष्य निर्वाह निधीमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी सीबीआय चौकशीही सुरू आहे. गुन्हेगार कंपन्यांसोबत करार करून सरकार त्यांना काळाबाजार करण्याची सूट देत आहे का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

श्वेतपत्रिका काढावी
राज्यात मोठी गुंतवणूक आली तर त्याचे स्वागतच केले पाहिजे पण केलेले करार व वस्तुस्थिती काय आहे हे जाणून घेण्याचा जनतेला अधिकार आहे. याआधीही असेच मोठे करार झालेले आहेत म्हणून एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारने दावोसमध्ये जाऊन महाराष्ट्रात आतापर्यंत आणलेली गुंतवणूक व त्यातून निर्माण झालेले रोजगार यावर एक श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

गुंतवणुकीची फसवाफसवी नको
राज्याचे मुख्यमंत्री दावोसमध्ये असताना छत्तीसगडचे मुख्यमंत्री विष्णुदेव साय यांनी मुंबईत येऊन महाराष्ट्रातून ६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक छत्तीसगडमध्ये घेऊन गेले हे विशेष. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव पुण्यात येऊन आपल्या राज्यातल्या उद्योजकांना भेटून मध्य प्रदेशात उद्योग घेऊन जात आहेत. सरकारने राज्यात गुंतवणूक आणावी पण दावोसमधील गुंतवणुकीच्या नावाने फसवाफसवी करू नये असा टोला पटोलेंनी लगावला.

भंडारा स्फोटाची चौकशी करा
भंडा-यातील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये मोठा स्फोट होऊन ७ कर्मचा-यांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दु:खद व वेदनादायी आहे. मोदी सरकारच्या काळात संरक्षण क्षेत्रातील कंपन्याही सुरक्षित नाहीत, या कंपनीतील स्फोट हे मोदी सरकारचे अपयश आहे. आरडीएक्स बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल या कंपनीत बनवला जातो. ही घटना गंभीर असून सर्वपक्षीय खासदारांच्या समितीमार्फत या स्फोटाची चौकशी करावी अशी मागणीही पटोले यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR