लातूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र इन्स्टिट्युट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालयाने नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय ‘स्पंदन नृत्यकला २०२५’ या युवक महोत्सवात शानदार कामगिरी करत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक ‘कावडी अट्टम’ या लोकनृत्य प्रकारात अत्यंत प्रभावी सादरीकरण करत या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला आहे.
या यशामागे संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. हनुमंत कराड यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन आणि प्राचार्य डॉ. सुभाष खत्री यांचे प्रभावी नेतृत्व मोलाचे ठरले. विद्यार्थ्यांना कलागुणांच्या अभिव्यक्तीसाठी सातत्याने प्रोत्साहन देणा-या संस्थेच्या प्रयत्नांना यामुळे यशाची ग्वाही मिळाली आहे. नृत्य सादरीकरणाच्या यशस्वीतेमध्ये शमयूर राजपूरे, यश देवणकर आणि मयुरी वाघमारे या कुशल नृत्यदिग्दर्शकांचे महत्वाचे योगदान राहिले. त्यांच्या अभ्यासपूर्ण प्रशिक्षणामुळे आणि प्रेरणेमुळेच सादरीकरण व्यावसायिक दर्जाचे ठरले. कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी डॉ. गौरव भटनागर आणि डॉ. प्रतिक्षा लंके यांनी टीम मॅनेजर्स म्हणून संघाचे उत्तम व्यवस्थापन केले. तर संस्थात्मक पाठबळ डॉ. शीतल घुले व डॉ. सलीम शेख यांनी दिले. अर्थसंकल्पीय बाजूची जबाबदारी डॉ. मोहम्मद झिशान यांनी अत्यंत कौशल्याने सांभाळली. विद्यार्थ्यांच्या अथक परिश्रमांना मिळालेले हे यश संपूर्ण संस्थेसाठी गौरवाची बाब ठरली असून, सांस्कृतिक परंपरेच्या संवर्धनासाठी महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ फिजिओथेरपी महाविद्यालय भविष्यकाळातही कटिबद्ध राहणार आहे.