मुंबई : महाराष्ट्र सदन घोटाळ्यातून दोषमुक्तीसाठी अर्ज करणारे राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत आणखी भर पडण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आला असून, तीन आरोपींनी आता माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केला आहे. सक्तवसुली संचालनालयाने २०१६ साली तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्यासह एकूण ५२ आरोपींविरुद्ध ८५० कोटींचा महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा व इतर गैरव्यवहार प्रकरणांत गुन्हा दाखल केला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने भुजबळ यांच्यासह इतर आरोपींची निर्दोष सुटका केली होती. मात्र, पीएमएलए कोर्टात सुनावणी सुरू आहे. त्याठिकाणीही भुजबळ यांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला आहे.
मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे तीन आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज सादर केला. यामध्ये सुनील नाईक, सुधीर साळसकर आणि अमित बलराज या आरोपींनी माफीच्या साक्षीदारासाठी अर्ज सादर केला. या अर्जावर २० डिसेंबरच्या सुनावणीत उत्तर सादर करण्याचे ईडीला निर्देश देण्यात आले. विद्यमान मंत्री छगन भुजबळ या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत. छगन भुजबळांसह इतरांना या खटल्यातून मुक्त करावे, या मागणीसाठी दाखल केलेल्या दोषमुक्तीच्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे. मात्र, ही सुनावणी थांबवून आमच्या माफीचा साक्षीदार होण्याच्या अर्जावर आधी निर्णय घ्यावा, अशी या तिघांनी कोर्टाला विनंती केली. या तिघांच्या वतीने वकील अॅड. रिझवान मर्चंट यांनी अर्ज दाखल केला आहे.