कोल्हापूर : महाविकास आघाडीने अडीच वर्षांत महाराष्ट्राच्या विकासात खोडा घालण्याचेच काम केले, ते सरकार म्हणजे विकासाचे मारेकरी होते, त्यांना पुन्हा सत्तेची संधी देऊ नका असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी येथे झालेल्या जाहीर सभेत केले. येथील मेरी वेदर मैदानावर महायुतीच्या राज्यातील प्रचाराचा प्रारंभ मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, रिपब्लिकन नेते केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.‘केलंय काम भारी..आता पुढची तयारी’ अशी टॅगलाईन असलेल्या महायुती विजय निर्धार सभेचे आयोजन महायुतीच्या पदाधिका-यांनी केले. यावेळी जिल्ह्यातील दहा मतदारसंघांतील विनय कोरे वगळता सर्व उमेदवार उपस्थित होते.
धनुष्यबाण हाच आमचा प्राण आहे, तो वाचवण्यासाठीच शिवसेनेच्या ५० आमदारांनी सत्ता सोडली. तसे आम्ही केले नसते तर बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्यांनी काँग्रेसला विकली असती असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी उध्दव ठाकरे यांना हाणला. ते म्हणाले, तुम्ही भाजपच्या पाठीत खंजीर खुपसला तो खरा महाराष्ट्रद्रोह आहे.
महाराष्ट्र आजही गुंतवणुकीत आणि उद्योगातही एक नंबरलाच आहे. तुम्ही काँग्रेससोबत जाऊन महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. त्या अडीच वर्षांत काय केले याचा हिशेब द्या, आम्ही आमच्या सव्वादोन वर्षांच्या कामाचा हिशेब द्यायला तयार आहोत. एकदा होऊनच जाऊ दे ‘दूध का दूध आणि पानी का पानी’.
आताही तुम्ही सरकार आले तर लाडकी बहीण योजना बंद करणार असल्याचे सांगत आहात. गोरगरिबांच्या हिताच्या योजनांची चौकशी लावू म्हणत आहात. तुम्ही प्रकल्प बंद पाडले, शेतक-यांच्या योजना बंद केल्या. आम्ही काम करणारे आहोत, तुम्ही काम बंद पाडणारे आहात. अशा लोकांच्या ताब्यात पुन्हा महाराष्ट्र देऊ नका.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आम्ही पक्ष चोरले असा आरोप करून विरोधक जनतेच्या मनांत सहानुभूती निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना थारा देऊ नका. खासदार धनंजय महाडिक यांनी आभार मानले. उदय सावंत यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, हसन मुश्रीफ, प्रकाश आवाडे, राजेश क्षीरसागर, महाडिक, राजेश पाटील, चंद्रदीप नरके, अशोकराव माने, राजेंद्र पाटील यड्रावकर, प्रकाश आबिटकर, राहुल आवाडे, शौमिका महाडिक यांच्यासह तीनही पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
शक्तिपीठ ज्यांना हवे त्यांना देऊ..
नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापूर परिसरातून विरोध झाला, ज्यांना हा प्रकल्प नको असेल त्यांच्या मागे आम्ही लागणार नाही. ज्यांना तो हवा असेल त्यांना देऊ अशा घोषणेचा मुख्यमंत्र्यांनी पुनरुच्चार केला.
बाबासाहब तुम्हारा संविधान रहेगा
लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार असा खोटा प्रचार केल्याने वेगळा निकाल लागला. परंतु यावेळेला या प्रचाराला जनता भुलणार नाही. कारण ‘जबतक सुरज-चाँद रहेगा.. बाबासाहब तुम्हारा संविधान रहेगा’ अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
महायुतीने जाहीर केली दहा वचने
लाडक्या बहिणींना महिन्याला १५०० ऐवजी २१०० रुपये देणार तसेच महिला सुरक्षेसाठी २५ हजार महिलांचा पोलिस दलात समावेश करणार.
शेतक-यांना कर्जमाफी करण्यात येणार असून शेतकरी सन्मान योजना १२ हजारांवरून १५ हजार करण्याचे आणि एम.एस.पी. वर २० टक्के अनुदान देणार.
प्रत्येक गरिबाला अन्न आणि निवारा देणार
वृद्ध पेन्शन धारकांना १५०० रुपयांवरून २१०० रुपये, जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणार
२५ लाख रोजगारनिर्मिती तसेच १० लाख विद्यार्थ्यांना रु.१०,००० विद्यावेतन देणार
४५,००० गावांत पाणंद रस्ते बांधणार
अंगणवाडी आणि आशा सेविकांना १५००० रुपयांचे वेतन आणि सुरक्षा कवच
वीज बिलात ३० टक्के कपात करून सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देणार
सरकार स्थापनेनंतर ‘व्हिजन महाराष्ट्र २०२९’ आराखडा १०० दिवसांत सादर करणार