पुणे : प्रतिनिधी
आपला भारत देश युवकांचा देश आहे. या युवा शक्तीच्या ताकदीवरच उद्याच्या विकसित भारताचे स्वप्न आपण पाहत आहोत. या स्वप्नपूर्तीच्या वाटचालीत क्रीडा क्षेत्राचे व खेळाडूंचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. कुठलाही खेळाडू हा मानसिक, शारीरिकरीत्या फिट आणि सांघिक भावना, खिलाडूवृत्तीने भारलेला असतो. त्यामुळे, समोर येणा-या कुठल्याही संकटाला तोंड देण्यास तो सक्षम असतो. खेळाडूंच्या जीवनात हे सर्व गुण बिंबवण्याचे काम महाविद्यालयीन जीवनात प्रामुख्याने होते. त्यामुळे, या काळात विश्वनाथ स्पोर्ट मिट सारख्या स्पर्धांचे व्यासपीठ मिळाल्याने खेळाडू घडतात, असे मत महाराष्ट्राचे क्रीडा व युवा कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केले.
ते एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टॅक्नॉलॉजी विद्यापीठ, विश्वराजबाग, पुणे तर्फे आयोजित विश्वनाथ स्पोर्ट मिट (व्हीएसएम-२०२५) या राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन/आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
याप्रसंगी माईर्स एमआयटी शिक्षण समूहाचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड, राजीव गांधी खेलरत्न व अर्जुन पुरस्कार प्राप्त नेमबाज अंजली भागवत व अर्जुन पुरस्कार विजेता पॅरा अॅथलिट सचिन खिलारे (रौप्य पदक विजेता, पॅरिस पॅराऑलिम्पिक स्पर्धा २०२४), एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. डॉ. मंगेश कराड, कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस., कार्यकारी संचालक डॉ. सुनीता कराड, प्र.कुलगुरु डॉ. रामचंद्र पुजेरी, डॉ. मोहित दुबे, कुलसचिव डॉ. महेश चोपडे, क्रीडा विभागाचे संचालक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा. पद्माकर फड, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. सुराज भोयर उपस्थित होते.
विश्वशांती प्रार्थना व स्पर्धेचा ध्वज फडकवल्यानंतर मॅनेट कॅडेटतर्फे प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देऊन सुरुवात करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांनी फुटबॉल स्पर्धेचीही सुरुवात केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा नियोजन समितीचे चेअरमन व कुलगुरू प्रा. डॉ. राजेश एस. यांनी तर आभार प्रा. पद्माकर फड यांनी मानले.