लातूर : प्रतिनिधी
महा बँकेतील मुजोर वरिष्ठ व्यवस्थापनाच्या विरोधात बँक कर्मचारी, अधिकारी यांनी जे आंदोलन छेडले आहे, त्यात मोडता घालण्याचा प्रयत्न व्यवस्थापनातील विविध व्यवस्थापक, झोनल मॅनेजर्स यांनी केला, तर संघटना त्यांची ही चापलुसी अजिबात खपवून घेणार नाही. हे आंदोलन त्यांचे विरुद्ध नसून बँक नीट चालावी, त्यांना झोन नीट चालविता यावे यासाठी आहे, हे लक्षात घेऊन त्यांनी कोणताही अडथळा करु नये, ही विनंती आहे. त्यातूनही कोणी असा आडवा आला तर मग प्रथम त्या प्रमुखास आंदोलनाचा तडाखा बसेल, असा इशारा बँक ऑफ महाराष्ट्र संघटनेचे अखिल भारतीय सचिव कॉ. धनंजय कुलकर्णी यांनी दिला.
बँक ऑफ महाराष्ट्रमधील चेअरमन व व्यवस्थापनाच्या मनमानी व एकाधिकारशाहीच्या विरोधात ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनने २० मार्च रोजी संपाची हाक दिलेली आहे. यातील कृती कार्यक्रमाचा भाग म्हणून बँकेच्या सर्व क्षत्रिय कार्यालयासमोर कर्मचा-यांनी ६ मार्च रोजी निदर्शने केली. सर्व संतप्त कर्मचारी, अधिकारी यांनी यावेळी जोरदार घोषणाबाजी देऊन चेअरमनच्या हुकूमशाहीला विरोध केला. यावेळी सेक्रेटरी कॉ. दीपक माने, कॉ. रेश्मा भवरे, अधिकारी संघटनेचे कॉ. विवेक पदरे, कॉ. संतोष मोलगे , कॉ.निलेश खरात, कॉ. श्रुती बोरकर, कॉ. प्रिया पवार यासह लातूर शहर व परिसरातील असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.