फलटणमधील घटनेने खळबळ, पीएसआयवर बलात्कार, छळाचा आरोप
पीएसआय, दोन डॉक्टरांवर कारवाई
फलटण : प्रतिनिधी
साता-यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत वरिष्ठ महिला डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना गुरुवारी रात्री उशिरा उघडकीस आली. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली. उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत महिला डॉक्टर काही महिन्यांपासून पोलिस आणि आरोग्य विभागाच्या एका वादात अडकली होती. या चौकशीमुळे त्या मानसिक तणावाखाली होत्या. त्यानंतर त्यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या तळहातावर सुसाईड नोट लिहून ठेवली. यात त्यांनी पीएसआय गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांच्यावर गंभीर आरोप केले. तसेच डॉक्टरांवरही आरोप केले. या प्रकरणी बदने यांना निलंबित करण्यात आले. तसेच २ डॉक्टरांनाही निलंबित करण्यात आले.
महिला डॉक्टरने यापूर्वीच आपल्या वरिष्ठ अधिका-यांकडे लेखी तक्रार देऊन माझ्यावर अन्याय होत आहे, मी आत्महत्या करीन असा स्पष्ट इशारा दिला होता. मात्र, या गंभीर इशा-यावर कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. वरिष्ठांकडे तक्रार करूनही दाद न मिळाल्याने अखेर त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. फलटणमधील एका हॉटेलमध्ये महिला डॉक्टरने आपले आयुष्य संपवले. रात्री उशिरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक तपासानुसार ही आत्महत्या असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आता उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणाला धक्कादायक वळण लागले.
मृत्यूपूर्वी महिला डॉक्टरने आपल्या तळहातावर पीएसआय गोपाल बदनेने चारवेळा बलात्कार केल्याचे लिहिले. माझ्या मरण्याचे कारण गोपाल बदने आहे. त्याने माझ्यावर चार वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर यांनी मला ४ महिने शारीरिक आणि मानसिक त्रास दिला, असा उल्लेखही हातावर दिसून आला. बनकर हा स्थानिक व्यक्ती आहे. या प्रकरणी फलटण सिटी पोलिसमध्ये गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपी गोपाल बदने आणि प्रशांत बनकर यांचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेतली. त्यांनी या प्रकरणी संबंधित जबाबदार असलेल्या पोलिसांना तात्काळ निलंबित करा, असे आदेश दिले. त्यावरून तातडीने कारवाई करण्यात आली. ही महिला डॉक्टर मूळ बीड जिल्ह्यातील रहिवासी आहे. या प्रकरणी माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली आहे.
पीएसआय गोपाळ बदने निलंबित
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडून घेतली. त्यांनी संबंधित पोलिस अधिका-याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश दिले. यानंतर गोपाळ बदनेला तात्काळ निलंबन करण्यात आले.
२ डॉक्टरांचेही निलंबन
फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्येप्रकरणी दोन डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली असून त्यांचे निलंबन करण्यात आले. महिला डॉक्टरने हातावर सुसाइट नोट लिहिली होती. त्यात दोन डॉक्टरांची नावे तिने लिहिली होती. त्या दोन्ही डॉक्टरांना निलंबित करण्यात आले.
शवविच्छेदन अहवाल
बदलण्यासाठी दबाव!
डॉ. महिलेच्या आत्महत्येनंतर त्यांच्या काकांनी माझ्या पुतणीवर शवविच्छेदन अहवाल बदलण्यासाठी दबाव आणला जात होता, ज्यामुळे ती मानसिक तणावाखाली होती. तणावामुळे आपल्याला आयुष्य संपवावे लागेल, असे वरिष्ठांना आणि नातेवाईकांना सांगितल्याचे त्यांनी म्हटले तर आतेभावाने महिलेला फोन करणारे फलटण भागातील खासदार होते, असा आरोप केला. नाव कोणाचेही नाही. परंतु खासदारांच्या पीएने खासदारांना फोन लावून दिला. बहीण त्यांच्याशी बोलली, असे त्यांनी म्हटले.
दानवे यांचा माजी
खासदारांवर आरोप
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी माजी खासदार रणजित निबाळकर, त्यांचा भाऊ अभिजित निंबाळकर आणि अजितदादांचा आमदार सचिन कांबळे यांच्यावर आरोप केले. हे तिघे मिळून तिथली यंत्रणा चालवतात, चुकीची कामे करण्यासाठी अधिका-यांवर दबाव टाकतात, असा आरोप केला. तसेच महाडिक नावाच्या पोलिस निरीक्षकावर कारवाई करण्याची मागणी केली.

