पुणे : प्रतिनिधी
पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या (पीएमपीएमएल) महिला बस वाहकाने कार्यालयातच आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. पीएमपीएमएलच्या उपमुख्य व्यवस्थापकांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप महिलेने केला आहे. शरीरसंबंधांस नकार दिल्यानेच आपल्याला सेवेतून निलंबित केल्याचा दावा तिने केला आहे. उपमुख्य व्यवस्थापकांच्या केबिनमध्येच तिने आत्मदहनाचा प्रयत्न केला. या घटनेने पीएमपीएमएलमध्ये खळबळ उडाली आहे.
उपमुख्य व्यवस्थापक संजय कुसळकर यांनी शरीरसंबंधांची मागणी केल्याचा आरोप आहे. शरीरसंबंध ठेवण्यास नकार दिल्यानेच सेवेतून निलंबित करण्यात आल्याचा पीडित महिलेचा दावा आहे. या खुर्चीचा गैरवापर होतोय असे म्हणत तिने कुसळकर यांच्या केबिनमध्येच स्वत:वर ज्वलनशील पदार्थ ओतून घेतला. त्यानंतर तिने स्वत:ला पेटवण्याचा प्रयत्न केला. पण महिला कर्मचा-यांनी तिला वेळीच रोखले. त्यामुळे अनर्थ टळला.
पीडित महिलेने कुसळकर यांची तक्रार महिला आयोगाकडेही केल्याचे समजते. पण तिच्या तक्रारीची कोणतीही दखल घेण्यात आली नाही. कुसळकर यांच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही. त्यामुळे त्रस्त झालेल्या पीडितेने अखेर कुसळकर यांच्या केबिनमध्येच स्वत:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. पण पीएमपीएमएलच्या कर्मचा-यांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने अनर्थ टळला.